सिंदखेडराजा:- येथील आसदबाबा संस्थान मधील दानपेटी व रक्कम चोरणाऱ्या दोन फरार चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे.
येथील आसदबाबा संस्थान मधील दानपेटी तसेच एक हजार रु. अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना एक वर्षांपूर्वी घडली होती. या चोरी प्रकरणी त्यावेळी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात येऊन तपास व चोरट्यांचा शोधही सुरु करण्यात आला होता. मात्र चोरटे अद्यापही फरारच होते.
या घटनेतील दोघे आरोपी हे सिंदखेडराजा येथेच असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम रखमाजी गीते यांना प्राप्त झाली. त्यावरुन पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, बजरंग बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पीएसआय श्रीकांत जिंदमवार, जमादार विलास काकड, श्रीकृष्ण चांदूरकर, नाईक गजानन चतुर, चालक संजय मिसाळ यांच्या पथकाने आज दि. १७ मे, सोमवारी सिंदखेडराजा येथे धाड टाकून आरोपी विनोद साहेबराव जाधव, वय ३० वर्षे, संतोष नवनाथ रंधवे, वय २५ दोघेही रा. मोठा बौद्धवाडा, सिंदखेडराजा यांना अटक केली आहे.
पुढील कारवाईसाठी आरोपींना सिंदखेडराजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.