Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सोयाबीन बियाणे विक्रीतून खरीप हंगामापूर्वीच लाखाचे उत्पन्न

बुलडाणा दि. 17 :  मागील वर्षी झालेला मुसळधार पाऊस.. काढणीच्या वेळी आलेला पाऊस.. यामुळे सोयाबीन बियाणे उगवणक्षम व दर्जेदार मिळण्याची साशंकता यावर्षी निश्चितच वाढलेली होती. त्यामुळे या वर्षीच्या खरीपात सोयाबीनचे कुठले बियाणे पेरावे या विंवचनेत बळीराजा होता. कृषि विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे पेरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे म्हणून ठेवले. घरचे बियाणे पेरण्याच्या आवाहनाला शेतकरी बांधवांनी प्रतिसाद देत घरचे बियाणे पेरण्याकडे कल वाढविला. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे सोयाबीन कृषि विभागाच्या सुचनेनुसार दर्जेदार साठवण करीत उगवणक्षम ठेवले. अशा शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात लाखमोलाची बियाणे विक्री केली आहे.

soyabeen

   चिखली तालुक्यातील किन्होळा, मंगरूळ नवघरे व अंबाशी येथील शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे विक्रीतून खरीप हंगामापूर्वीच लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. कृषि विभागाने सोयाबीन शेतमाल पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरण्यासाठी काही सूचना शेतकरी बांधवांना दिल्या. त्यानुसार किन्होळा येथील किसन कोंडुबा बाहेकर, मंगरूळ नवघरे येथील नितीन रविंद्र तांबट व अंबाशी येथील प्रतापराव श्रीधरराव देशमुख यांनी आपल्या शेतातील सोयाबीन कृषि विभागाच्या सुचनांनुसार बियाण्यासाठी घरीच व्यवस्थित रित्या साठवण केले. त्यामुळे या खरीप हंगामात त्यांच्या सोयाबीनला बियाणे म्हणून अधिक पसंती मिळाली.

  किन्होळ्याचे किसन बाहेकर यांनी 20 शेतकऱ्यांना 55 क्विंटल बियाणे विक्रीतून 4 लक्ष 40 हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांनी 8 हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे बियाणे विक्री केली आहे.  तर मंगरूळ नवघरे येथील नितीन तांबट यांनी 12 शेतकऱ्यांना 32.80 क्विंटल बियाणे विक्रीतून 3 लक्ष 28 हजार रूपये मिळविले आहे. श्री. तांबट यांनी 10 हजार रूपये प्रति क्विंटल दर मिळविला आहे.  तसेच 11 शेतकऱ्यांच्या 15 क्विंटल बियाणे विक्रीतून अंबाशीच्या प्रतापराव देशमुख यांनी 1 लक्ष 20 हजार रूपयाचे उत्पन्न प्राप्त केले.  त्यांनी 8 हजार रूपये प्रति क्विंटल दर प्राप्त करून उत्पन्न मिळविले आहे.

  चिखली तालुका कृषी कार्यालयाने सोयाबीन उपलब्धतेची यादी तयार करून दिल्यामुळे विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी संपर्क करून सोयाबीन बियाणे हे कमी कालावधीमध्ये योग्य दरामध्ये विकल्या गेले. सदर बियाणे हे बाजारामध्ये विकले असता प्रति क्विंटल 6 हजार  रूपये दराने विकल्या गेले असते. मात्र कृषि विभागाने केलेल्या प्रचार – जनजागृतीमुळे प्रति क्विंटल 8 ते 10 हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे दर मिळाला. त्यामधून प्रति क्विंटलमागे जास्तीचा दर मिळाला. तसेच विशेष म्हणजे ग्राहक शोधण्याची गरज पडली नाही. तरी शेतकरी बांधव यावर्षीसुद्धा उत्पादीत सोयाबीन माल कृषि विभागाच्या सुचनेनुसार साठवण करून पुढील वर्षी बियाणे म्हणून विक्री करू शकता. घरच्या घरी उगवणक्षम बियाणे तयार करावे व खर्चात बचत करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.