किनगावराजा आनंद राजे – गत दोन वर्षांपासून देशामध्ये कोरोना या महाभयानक विषाणूच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा बंद आहेत. पण शासनाच्या “शाळा बंद शिक्षण चालू” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शालेय शिक्षण चालू आहे, मात्र या ऑनलाईन शिक्षणाला आता विद्यार्थी कंटाळून गेले असल्याने पालकांनाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता भेडसावत असून किनगावराजा परिसरातील प्रायमरी विद्यार्थ्यांचे पालक ‘ कधी वाजणार शाळेची घंटा ? या प्रतीक्षेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहवयास मिळत आहे.
शासनाच्या ‘शाळा बंद ऑनलाईन शिक्षण चालू’ या उपक्रमा अंतर्गत सध्या किनगावराजा व आजूबाजूच्या परिसरातील गुरुजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देतांना सध्या दिसत आहेत. परंतु विद्यार्थी अशा ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणात अजूनतरी पूर्णतः स्थायिक झालेले दिसत नाही. शासनाने ज्या गावात एकही कोरोना रुग्ण नाही त्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु केले आहेत परंतु पहिली ते सातवी या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला सरकारकडून कोरोना प्रसाराच्या भीतीमुळे शाळा सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र ग्रामीण आणि शहरी भागात विविध राजकीय कार्यक्रम आणि लग्न सोहळे हे विना मास्क आणि गर्दी करून कुठलेही कोरोनाचे नियम न पाळता राजरोस पद्धतीने होत आहेत मग अशा कार्यक्रमांना शासन कशी काय परवानगी देतात? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडत आहे.
शाळा बंद असल्या तरी शाळेवर शिक्षकांची उपस्थिती शासनाने शंभर टक्के अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना पालक आणि विद्यार्थी हे शाळा नियमितपणे कधी सुरु होणार याची सतत विचारणा करीत आहे.विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन शिक्षण दिले जाते परंतु या ऑनलाईन शिक्षणातही खूप अडचणी निर्माण होत आहेत. काही पालकांकडे मोबाईल घेण्याची ऐपत नसल्यामुळे असे विद्यार्थी ऑनलाईन क्लास करू शकत नाहीत अशा समस्याही आहेत.काही पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल उपलब्ध करून दिला आहे परंतु ग्रामीण भागात नेहमी असलेल्या नेटवर्कच्या अडथळ्यामुळेही विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करून दररोज शाळा जर सुरु झाल्या तर योग्य राहतील अशा प्रतिक्रियाही पालकांच्या येत असल्याचे चित्र आहे.
शासन निर्णयानुसार १७ जुलै पासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत मात्र प्राथमिक स्तरावर शाळा सुरु करण्यास सरकारकडून कोणताही निर्णय अजून झाला नाही. सरकार शाळा सुरु करण्यास परवानगी देत नाही आणि इतर सार्वजनिक राजकीय,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम सर्रासपणे सुरु आहेत याची चर्चा पालक वर्गात सुरु असून योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरु कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.
उमेश वायाळ( पालक किनगावराजा)
प्रतिक्रिया :- कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणातून मागे पडतअसून कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून शासनाने पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा लवकर सुरु करणे आवश्यक आहे.