बुलडाणा, दि. 15 : माजी सैनिक कल्याण मंत्री दादाराव भुसे, सैनिक कल्याण विभाग पुणे येथील संचालक प्रमोद यादव यांच्या आदेशानुसार आजी, माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या अध्यक्षतेखाली आज 15 सप्टेंबर रोजी प्रभा भवन, पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथे बैठक आयोजित करण्यात आली. समितीच्या माध्यमातून आजी तसेच माजी सैनिकांनी जमीन अतिक्रमण, सैनिकांच्या कुटूंबावरील अन्याय, अत्याचार दूर करणे, ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका यांच्या बाबतच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आजी, माजी सैनिकांच्या कुटूंबियांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सैनिक सेलही स्थापन करण्यात आला आहे.
सदर समितीचे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया अध्यक्ष आहे. यामध्ये सदस्य म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर भास्कर निंबाजी पडघान, एपिया आर्थिक गुन्हे शाखा श्रीमती अ. निकाळजे यांचा समावेश आहे. तर बुलडाणा तालुका सदस्य म्हणून नायक हिम्मतराव रामराव उबरहंडे, चिखली तालुका सदस्य सुभेदार अशोक त्र्यंबकराव भुतेकर, मेहकर तालुका सदस्य हवालदार सुभाष जयराम इंगळे, लोणार तालुका सदस्य हवालदार भानुदास भिकाजी गोडसे, दे. राजा तालुका सदस्य नायब सुभेदार दत्तात्रय रंगनाथ जाधव, सिं. राजा तालुका सदस्य हवालदार फकीरा जाधव, नांदुरा तालुका सदस्य सु. मे. ऑ. लेफ्ट. जी एस बगाडे, खामगांव तालुका सदस्य हवालदार संजय भाऊराव ससाणे, शेगांव तालुका सदस्य हवालदार विष्णू पहुरकर, मोताळा तालुका सदस्य हवालदार सदाशिव घाटे, मलकापूर तालुका सदस्य हवालदार गोपाल तुळशीराम दवंगे, संग्रामपूर तालुका सदस्य हवालदार भास्कर वासुदेव मालोकार आणि जळगांव जामोद तालुका सदस्य नाईक निरंजन हिरामन सावळे यांचा समावेश आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.