चिखली – बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात दि.28 जून रोजी झालेल्या ढगफुटीमुळे व धरण फुटल्यामुळे शेकडो हेक्टर जमीन वाहून गेली आहे. घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज 29 जून रोजी सकाळी भल्यापहाटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी तुपकरांसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अंबाशी, हिवरखेड, आमखेड गावांसह 10 ते 12 गावांमध्ये शेकडो हेक्टर जमीन 5 ते 6 फुटापर्यंत खरडून गेली आहे. शेतात नद्या तयार झाल्याचे चित्र आहे. या शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई तात्काळ मिळाली पाहिजे. या शेतकऱ्यांना वर्षभर पीक घेता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही घेतली पाहिजे व जमीन तयार करण्यासाठी लागणारा खर्चही सरकारने दिला पाहिजे,अशी मागणी रविकांत तुपकर यांनी यावेळी केली..
तसेच प्रशासनाची यामध्ये मोठी चूक असल्याचे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले. अंबाशी धरणाच्या भिंतीवर वनस्पती वाढल्याने वनस्पतींच्या मुळामुळे धरणाची भिंत कमकुवत झाली, त्यामुळे हे मोठे नुकसान झाले. तसेच आमखेड धरणाच्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने धरणफुटीचे संकट ओढवले. त्यामुळे यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही तुपकरांनी यावेळी केली..