राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी राजीव सातव यांना सोमवार (ता. 17) ला हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या पार्थीवाला मुलगा पुष्कराज सातव यांनी भडाग्नी दिला. अनेकांना शोक अनावर झाला. पत्नी डाॅ. प्रज्ञा आणि माजी मंत्री आई रजनी सातव यांचा टाहो उपस्थितांचा काळीज फाडून टाकणारा होता. यावेळी राज्यासह विविध राज्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी मंत्री, आमदार, कार्यकर्त्यांची, उपस्थिती होती.
राज्यसभेचे खासदार अॅड राजीव सातव यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाल्यानंतर रविवार (ता. 16) ला सायंकाळी त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री रजनी सातव व राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासमवेत पालकमंत्री वर्षा गायकवाड या पूर्णवेळ येथे उपस्थित होत्या. रात्रभर राज्य व राज्याबाहेरील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची ये- जा सुरु होती. सोमवारी (ता. 17) ला त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे आई रजनी सातव, मामा प्रतापराव वाघ, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, प्राचार्य डॉ. बबन पवार व सातव यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सकाळी पार्थिवाचे पूजन करुन आरती केल्यानंतर साडेसात वाजता पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.
राजीव सातव यांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्याकरिता कळमनुरी, हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांनी उपस्थिती लावली. श्री सातव यांचे पक्षसंघटनेत असलेले संबंध व वजन पाहता राज्यभरामधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री तसेच विविध राज्यातील पक्षाचे पदाधिकारी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. एच. पाटील, महुसल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, पूनर्वसन व मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सतेज पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार माधवराव जवळगावकर,आमदार राजू नवघरे, आमदार आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाऊ पाटील, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास, सत्यजित तांबे, अमर खानापुरे, गुजरात युवक काँग्रेसचे मानसिंग डोड्या, श्री संपत कुमार, नीरज कुंडल, यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
RAJIV SATAV
पक्षाच्या अध्यक्षा व नेत्या सोनिया गांधी यांच्या वतीने काँग्रेसचे प्रभारी के. एच. पाटील यांनी श्रद्धांजली वाहून राजीव सातव यांच्या जाण्यामुळे पक्षाची मोठी हानी झाल्याचे यावेळी सांगितले. तर खासदार राहुल गांधी यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी श्रद्धांजली वाहिली. तर प्रियंका गांधीच्या वतीने मंत्री अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली तर जयप्रकाश दांडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी राजीव सातव यांच्या आठवणीला उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही श्रद्धांजली वाहिली. दरम्यान राजीव सातव यांना पोलिसाच्या वतीने मानवंदना देण्यात येऊन हवेत तीन फैरी झाडण्यात आल्या त्यानंतर पार्थिवाला मंत्रौपचाराच्या निनादत श्री सातव यांचे पुत्र पुष्कराज सातव यांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राजीव सातव अमर रहे अशा घोषणा दिल्या. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.