दि.२५(प्रतिनिधी) यदुकुलभूषण लखुजीराजे जाधवराव प्रतिष्ठान सिंदखेडराजा अंतर्गत सिंदखेडराजा परिसरातील राजे लखुजीरावांचे वंशजांच्या वतीने तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते क्षात्रतेज संपन्न राजे लखुजीराव जाधव त्यांची २ मुले अचलोजी राजे,रघुजी राजे तसेच त्यांचे नातू यशवंत राजे,यांचा ३९४ वा स्मृतिदिन संपन्न झाला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लखुजीराजे यांच्या समाधीचे विधिवत पूजन करण्यात आले.
स्वराज्य प्रेरक राजमाता जिजाऊ यांचे पिता लखुजीराजे जाधव व त्यांची २ मुले व नातू यांची निजामाच्या दरबारात विश्वासघाताने हत्या करण्यात आली होती.स्वराज्य निर्मितीच्या हालचाली त्यांनी सुरु केल्यामुळे त्याचा सुगावा निजामाला लागल्याने निजामाने कपटाने बोलावून लखुजीराजेंची हत्या घडवली होती.स्वराज्यासाठी पहिले बलिदान लखुजीराजेंनी दिल्यामुळे त्याचे स्मरण होण्यासाठी लखुजीराजेंच्या वंशजांच्या व मान्यवरांच्या वतीने समधीस्थळी अभिवादन व श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला.
अभिवादनासाठी माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.नाझेर काझी,उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड,शिवसेना तालुका प्रमुख वैभव देशमुख,माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे,छगन मेहेत्रे,शिवसेना नेते डॉ.रामप्रसाद शेळके,भाजपचे युवा नेते ऍड.संदीप मेहेत्रे,विनोद ठाकरे,अतिष तायडे,डॉ.सुवर्णलता जाधवराव,अमरसिंह जाधवराव दिलीपराव आढाव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
समधीस्थळावरील अभिवादनाच्या कार्यक्रमा नंतर जिजाऊ सृष्टी येथे शिवव्याख्याते उद्धवराव शेरे पाटील यांनी लखुजीराजेंच्या जीवनावर व्याख्यान दिले.घनसावंगी तालुक्यातील शाहीर अरविंद घोगरे यांनी पोवाडा सादर केला.दरम्यान जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथेही जाधवरावांची शाखा असल्याचा ऐतिहासिक पुरावा असलेल्या ई.स.१७२५ सालाच्या शिलालेखाचे प्राचीन इतिहासाचे अभ्यासक व शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी संशोधन केलेल्या निळकंठराव जाधवराव यांच्या शिलालेखाचे व शाहूकाळातील सहा आज्ञापत्राचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.डॉ.नरेशराजे यांनी या पत्रांचे वाचन केले.
यावेळी घनसावंगी येथील जी.प.सदस्य जयमंगल जाधव,सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे अरगडे गव्हाण येथील वंशज संजयसिंह गुजर,सुरेश ठाकरे,भास्कर वराडे, डिगंबर ढेरे,बबलू घोगरे,अशोकराव राजे, सुदामबाप्पा बुकने पाटील,माजी नगराध्यक्ष राज जाधवराव, संतोष बंगाळे,होळकरशाहीचे अभ्यासक राम लांडे,कृष्णा गाडेकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज शिवाजीराव मोहिते,प्रास्ताविक यदुकुलभूषण राजे लखुजीराव जाधवराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत राजेजाधव,सूत्रसंचालन प्रा.गोपाल राजेजाधव व आभार प्रदर्शन आनंद राजेजाधव यांनी केले.