जिजाऊंच्या जन्मस्थळावर स्वराज्य संकल्पक,महत्वकांक्षी लखूजीराजेंचा पुतळा उभारावा – लखुजीराजेंच्या वंशजांचे सुप्रियाताईंना निवेदन
सिंदखेड राजा प्रतिनिधी – क्षात्रतेज संपन्न राजे लखुजीराव जाधव यांचा सिंहासनावर विराजमान असा भव्य पूर्णाकृती पुतळा सिंदखेडराजा येथील लखुजीराजेंच्या राजवाड्यात उभारावा अशा मागणीचे निवेदन किनगावराजा येथील लखुजीराजेंचे वंशज विजयसिंह राजे,सुभाष राजे,प्रा.गोपाल राजे,आनंद राजे यांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले.मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी व भविष्यात त्यांचा जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने खा.सुप्रिया सुळे सिंदखेडराजा येथे आल्याच्या निमित्ताने त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
माँ जिजाऊंनी बाल्यावस्थेतच स्वराज्याची प्रेरणा पिता लखुजीराजेंच्याकडून घेतली होती.तत्कालीन तीन शाहींच्या विरोधात उभे राहून विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र करण्याचे कार्य लखुजीराजेंनी त्या काळात केले होते.याकरिता अत्यंत मजबूत अशा काळाकोट किल्ल्याच्या उभारणीचे कार्यही त्यांनी हाती घेतले होते.अशा महान स्वराज्य संकल्पक,महत्वकांक्षी राजाचा इतिहास येणाऱ्या पिढीस प्रेरणादायी ठरावा याकरिताच लखूजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा राजवाड्यात उभारावा असे खा.सुळेंना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.याअगोदरही येथील वंशजांनी पुतळ्यासंदर्भात नागपूर येथील पुरातत्व खात्यास निवेदन दिले असल्याची माहिती खा.सुळेंना दिलेल्या निवेदनामध्ये दिली आहे.
दरम्यान निवेदनासमवेतच लखूजीराजेंचे सिंहासनावर विराजमान असे छायाचित्र पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व रा.काँ.जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी यांच्या उपस्थितीत खा.सुप्रियाताईंना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मीडिया सेलचे तालुका अध्यक्ष अमोल भट, नवाज पठाण ,कामगार सेलचे सचिन मांटे आदींची उपस्थिती होती.