किनगावराजा(प्रतिनिधी,सचिन मांटे) – किनगावराजा येथून जवळच असलेल्या पांग्री उगले गावातील सुभाष शिवाजी क्षीरसागर यांच्या शेतातील विहिरीमध्ये दिनांक १४ फेब्रुवारी रोजी मृतदेह तरंगत असतांना आढळला सुरुवातीस मृतदेहाची ओळख पटत नव्हती परंतु मृतकाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डमुळे ओळख पटली असून सदर मृतक व्यक्ती सावरगाव तेली गावाची असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे.यावर सुभाष क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार साधारणतः सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतामध्ये फिरण्यासाठी गेलो असता मालकीच्या विहिरीमध्ये डोकावले असता पुरुष जातीचे प्रेत तरंगतांना दिसले.यावर पांग्री उगले गावाचे पोलीस पाटील वसंत शेषराव उगले यांना फोनद्वारे माहिती कळवून घटनास्थळी बोलावून घेतले.सदर प्रेत उलटे तरंगत असल्यामुळे ओळख होत नव्हती यावर किनगावराजा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
मृतकाचा चेहेरा खेकडे व माशांची कुरतडलेला असल्याने मृतकाची ओळख होत नव्हती मृतदेह साधारणतः अंदाजे ३ दिवसापूर्वीचा असल्याचे कुजलेल्या अवस्थेत होता.किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांनी मृतकाच्या खिसे तपासल्यावर नोटांमध्ये मृतकाचे आधारकार्ड अढळून आले.यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरवून मृतकाची लगेच ओळख पटली.लोणार जवळील सावरगाव तेली गावच्या ३० वर्षीय रामधन शंकर पवार असे मृतकाचे नाव असून पांग्री उगले गाव हे त्याची सासरवाडी आहे.साधारण ४ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असून ३ वर्षे वयाचा त्यास मुलगा आहे.मृतकाची पत्नी गरोदर असल्या कारणाने बाळंतपणासाठी पांग्री उगले गावी माहेरी आली असल्याची माहिती मिळाली आहे.
रामधन शंकर पवार यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ठाणेदार युवराज रबडे यांच्या आदेशाने दुय्यम ठाणेदार बनसोडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चाटे,कॉन्स्टेबल सुभाष गीते,गणेश लोडे, रोशन परसुवाले,जाकेर चौधरी,मिलिंद सोनपसारे, नजीम चौधरी,श्रावण डोंगरे पुढील तपास करीत आहे.