जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळण्याच्या आशा पल्लवित
गजानन सोनटक्के जळगाव जा – बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, शेगाव व संग्रामपूर हे तिन्ही तालुके शासनाच्या निकषानुसार पूर्णतः पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. सतत च्या पावसाने व अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही या उलट उपरोक्त तिन्ही तालुके हे पिक विमा कंपनीने जाणीवपूर्वक डिस्प्युट मध्ये टाकलेले आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2020 ची कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पिक विमा काढण्याकडे पाठ फिरवली आहे या विषयाला घेऊन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिनांक 14 जुलै रोजी कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले यावर बैठक घेऊन कृषी विभागाला तसेच विमा कंपनीला स्पष्ट निर्देश देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आ. डॉ. कुटे यांच्या विनंती ची तात्काळ दखल घेत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिनांक 22 जुलै रोजी बुलडाणा जिल्हा पीक विमा नुकसान भरपाई बाबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश कृषि विभागाला दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सदर बैठकीला राज्यमंत्री कृषी, आ. डॉ. संजय कुटे, सचिव (कृषी), आयुक्त (कृषी), जिल्हाधिकारी बुलडाणा,जिल्हा कृषी अधीक्षक बुलडाणा,विमा कंपनी चे अधिकारी आदींना दिनांक 22 रोजी मंत्रालय येथे उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.