बुलडाणा, दि. 29 : वृद्धांना त्यांची तक्रार दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांमध्ये वृद्धांसाठी विशेष कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्याचा आधार घेवून प्राप्त तक्रारींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाकडून केला जाणार आहे. मुले सांभाळ करीत नसतील, तर अशा वृद्धांच्या तक्रारींची सुनावणी घेण्याचे, त्यांना पोटगी मिळवून देण्याचे अधिकार कायद्याने महसूल विभागातील विभागीय प्रांत अधिकाऱ्यांकडे आहेत.
अनेक सरकारी योजनांमध्ये वृद्धांना खास सवलती आहेत. त्यामुळे या योजनांची माहिती होणे, दावा करणे, तक्रार असल्यास ती देणे यासाठी प्रत्येक जिल्हा कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात वरिष्ठ लिपीक दर्जाचा अधिकारी प्रमुख असेल. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल तो घेणार आहे. त्यासाठी कायद्याच्या आधारे पाठपुरावा करेल व तक्रारीचे निवारण करून घेईल. योजनांची माहितीही त्याच्याकडून वृद्ध नागरिकांना दिली जाईल. तक्रारदार व सरकारी यंत्रणा यांच्यातील समन्वयक म्हणून तो काम करेल, असे सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी कळविले आहे.