पात्र शेतकऱ्यांना बँकांनी गतीने पीक कर्ज वाटप करावे.पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
दि ६ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठक संपन्न झाली.
खरीप हंगाम सुरू झाला आहे. मान्सून पूर्व पाऊस जिल्ह्यात सुरु आहे. मान्सून पूर्व पाऊसामुळे शेतकरी पेरणीसाठी शेती सज्ज करीत असून शेतकरी जोमाने खरिप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे बँकांनी आता पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी. पीक कर्ज वाटप या बाबीला प्राधान्य देवून पात्र सभासद शेतकऱ्यांना गतीने संपूर्ण पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ.शिंगणे साहेब यांनी दिल्या.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा काही बँका शेतकऱ्यांना लाभ देत नसल्याचे निदर्शनास आले असून, डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लाभदायी आहे. मात्र काही बँका लाभ देत नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ दिल्याचा मागील पाच वर्षाचे रेकॉर्ड तपासण्यात यावा. यामध्ये लाभ न दिलेल्या बँकांवर कारवाई करण्यात यावी. कर्जमाफी झालेला व पात्र एकही सभासद पीक कर्जापासून वंचित राहू नये, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज वितरण करणे बाबद पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सूचना केल्या.
बँकांनी पीक कर्जासाठी लागणारे कागदपत्रांची माहिती बँक शाखेच्या दर्शनी भागात फलकावर किंवा बॅनर वर लावावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना कागद पत्रांची माहिती होईल. कुणालाही विचारावयाची गरज पडणार नाही. बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करताना उद्घट वागणूक देवू नये. व्यवस्थित समजावून सांगत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मदत करावी. खरीप हंगाम तोंडावर आलेला असुन शेतकरी खते, बि बियाणे आदी कृषी निविष्ठा खरेदीत मग्न आहे. त्यामुळे तातडीने पीक कर्ज वितरण करावे.
जिल्हा बँकेमार्फत लाभ मिळालेल्या परंतु कर्ज वाटप न झालेल्या प्रत्येक सभासदाला संलग्न राष्ट्रीयकृत बँकेने कर्जवाटप करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.शिंगणे साहेब यांनी दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील खा.प्रतापराव जाधव, जिल्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा, कृषी सभापती, जिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ,जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे श्री. खरात, विविध बँकांचे प्रतिनिधी, नोडल अधिकारी उपस्थित होते.