नवरात्रोत्सवानिमित्त किनगावराजात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल ; अखंड हरिनाम सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवात पदार्पण (फोटो)
नवरात्रोत्सवानिमित्त किनगावराजात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल ; अखंड हरिनाम सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवात पदार्पण (फोटो)
किनगावराजा दि.२४ (प्रतिनिधी) येथील श्री कामक्षा देवीच्या नवरात्रोत्सव निमित्त घेण्यात येत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास ५० वर्ष पूर्ण होत असल्याने यावेळी सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असून यामध्ये काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,विष्णू सहस्रनाम,तुकाराम महाराज गाथा भजन,प्रवचन,हरिपाठ व कीर्तनाचा समावेश असल्याची माहिती श्री कामक्षादेवी संस्थानच्या विश्वस्थांकडून देण्यात आली आहे.
दिनांक २६ सप्टेंबरपासून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.हरीभक्त परायण रंगनाथ महाराज परभणीकर,वेदशास्त्र संपन्न किसन महाराज साखरे तसेच आडगावराजा येथील राजे शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने गत ५० वर्षांपासून किनगावराजा येथील लखुजीराजे जाधव यांचे वंशज असणाऱ्या समस्थ राजेजाधव परिवारांच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.यंदा या सप्ताहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने दररोज दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महिलांचे तर रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे किर्तन होणार आहे.
दिनांक २६ पासून रोजी रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान हभप सर्वश्री रघुनाथशास्त्री देशपांडे,सतीश महाराज बनकर,प्रेमानंद महाराज देशमुख,वाघ गुरुजी,नाना महाराज पोखरीकर,अनिरुद्ध महाराज क्षीरसागर,डॉ.यशोधन महाराज साखरे,शंकर महाराज शास्त्री यांचे कीर्तन होणार आहे. दिनांक २७ पासून दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार हभप सर्वश्री शिवलीलाताई पाटील,ज्योतिताई चौधरी,देशमुखताई शेंदुर्जनकर,रुपालीताई सवने परतूरकर,कांचनताई वायाळ,नंदाताई देशमुख ताडशिवणीकर,जनाताई डोंगरे आळंदीकर यांचे हरीकीर्तन होणार असून दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान निवृत्तीमहाराज पाचनवडगावकर यांच्या वतीने काल्याच्या कीर्तनाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची ग्रामप्रदक्षणा करून सप्ताहाची सांगता होणार आहे.
परिसरातील सर्व भाविकांनी या सप्ताहात सामील होण्याचे आवाहन श्री कामक्षादेवी संस्थानचे पारंपरिक विश्वस्थ राजेजाधव परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.