सिंदखेडराजा:- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या साहाय्याने पत्नीने खून केल्याचा प्रकार काल दि. १५ मार्च, मंगळवारी दुपारी तालुक्यातील गोरेगाव येथे उघडकीस आला.साखरखेर्डा पोलिसांनी ह्या प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या घटनेचे वृत्त येताच परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ह्या प्रकरणी गोरेगाव येथील मृतकाची आई तुळसाबाई रुपलाल कव्हळे वय ६५ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मोठा मुलगा दत्तात्रय रुपलाल कव्हळे वय ४० वर्षे हा कुटुंबापासून वेगळा राहत होता. त्याला पत्नी मीरा, दोन मुले व एक मुलगी आहे. सुमारे पंचवीस दिवसांपूर्वी दत्तात्रय कव्हळे ह्याने पत्नी व तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधाची रेकॉर्डिंग पकडली होती. त्यानंतर त्याने पत्नीला तिच्या माहेरी नेऊन सोडले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी मीरा हिला तिचा भाऊ अनिल खनसरे ह्याने गोरेगाव येथे आणून सोडले होते. त्यावेळी दत्तात्रय ह्याला कुटुंबीयांनी समजावून सांगितले होते. तसेच दत्तात्रय व मीरा ह्या दोघा पतीपत्नीला कामासाठी अहमदनगर येथे पाठवले.
परंतु बायकोच्या बाहेरच्या प्रेमसंबंधाच्या मानसिक ताणामुळे दत्तात्रय हा दारु प्यायचा, असेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान कव्हळे कुटुंबीयांना जमीन विकत घ्यायची असल्याने दत्तात्रयला बोलावल्यामुळे पत्नी मीरा सोबत तो दि. १४ मार्च, सोमवारी घरी परतला होता. दि. १५ मार्च, मंगळवारी सकाळी आईकडे जाऊन शेतीच्या खरेदी संदर्भात चर्चा केली व मुलगी रोशनी हिचा पेपर असल्याने तिला साखरखेर्डा येथे घेऊन गेला. त्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान फिर्यादी तुळसाबाई व त्यांचा मुलगा अशोक कव्हळे हे दत्तात्रयच्या घराकडे गेले होते. त्यावेळी गावातील पठाण नामक व्यक्ती पळून जात असल्याचे पाहिले. त्यावेळी ते दोघे घरात गेले असता दत्तात्रय हा पाय रुमालाने पलंगाला बांधलेल्या व तोंडावर चादर टाकलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी तुळसाबाई ह्या त्याच्याकडे जात असतांना त्यांची सून मीरा दत्तात्रय हे झोपलेले असून त्यांना उठवू नका असे म्हटले.
त्यामुळे त्या तेथून आपल्या घरी निघून गेल्या. त्यानंतर दोन तासांनी मीरा हिने फोन करुन दत्तात्रय हा काहीच हालचाल करीत नसल्याचे सांगितले, त्यावरुन तुळसाबाई व त्यांचा दुसरा मुलगा अशोक ह्या दोघांनी त्यांचे घरी जाऊन पाहिले असता दत्तात्रय पलंगावर पडलेल्या अवस्थेत व त्याच्या गळ्याला गळफास लावल्याचे व्रण दिसून आले. त्यानंतर गावातील एका गाडीतून दत्तात्रय ह्याला साखरखेर्डा व तेथून चिखली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दत्तात्रय ह्यास मृत घोषित केले.उपचारासाठी दवाखान्यात येत असतांना गाडीत सून मीरा हिने आपण व आपला प्रियकर एजाजखान शहजादखान पठाण दोघांनी मिळून दत्तात्रय ह्याचे पाय रुमालाने बांधून व गळ्याला दोरीने आवळून गळफास लावून मारल्याचे सांगितले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.
साखरखेर्डा पोलिसांनी ह्या प्रकरणी अप. नं. ६०/२०२२ कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून मृतकाची पत्नी आरोपी मीरा दत्तात्रय कव्हळे, वय ३६ वर्षे व एजाजखान शहजादखान पठाण, वय ४५ वर्षे दोघेही रा. गोरेगाव ह्यांना अटक केली आहे. ह्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार जितेंद्र आडोळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कानडे व सहकारी पोलीस पुढील तपास करीत आहेत.