अन्यथा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा तालुक्यातील रुम्हणा येथील रंगनाथ खेडकर या खून प्रकरण तपासात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय मृतकाच्या पत्नीने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हा तपास अमडापूर पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून देण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच तपास यंत्रणा बदलली नाही तर अमरावती येथे उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ह्यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहे व खून प्रकरणाचा गुंता वाढताना दिसतोय .
रुम्हणा येथील शेतकरी रंगनाथ तुकाराम खेडकर, वय वर्षे ५३ ह्यांना दि. ३१ मे २०२१ रोजी अज्ञात इसमांनी विमा संदर्भात कॉल करुन आधारकार्ड व पॅन कार्ड हे कागदपत्रे घेऊन पांग्री उगले फाट्यावर बोलावले होते. त्यानंतर तेव्हापासून रंगनाथ खेडकर बेपत्ता झाले होते. त्यावरुन त्यांचे चुलतभाऊ गबाजी खेडकर, वय ५० वर्षे ह्यांच्या फिर्यादीवरुन किनगावराजा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली व तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान दि. ३ जून, गुरुवारी दुपारी अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेनटाकळी तलावात रंगनाथ खेडकर यांचा मृतदेह आढळून आला होता . त्यासंदर्भात खून करुन पुरावा नष्ट करणे प्रकरणी अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनाक्रमादरम्यान साखरखेर्डा पोलिसांना दोन अज्ञात युवकांनी चाकूचा धाक दाखवून एका युवकाचा मोबाईल हिसकावून नेल्याच्या तपासात रंगनाथ खेडकर यांच्या खून प्रकरण सलंगणित भरत प्रल्हाद जायभाये, अंकुश डोईफोडे व सचिन काळुसे ह्या आरोपींचा छडा लागला.
आरोपींना ताब्यात घेऊन अमडापूर ठाणेदार अमित वानखेडे, पीएसआय प्रवीण सोनवणे व पोलिसांनी तपास सुरु केला.
यासंदर्भात मृतक रंगनाथ खेडकर यांची पत्नी विद्या खेडकर यांनी विविध आरोप करीत राज्याचे गृहमंत्री यांच्या नावे लिहिलेले निवेदन काल दि. १४ जून, सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. ह्या निवेदनात विद्या खेडकर यांनी म्हटले आहे की, तपासादरम्यान आरोपीने खुनाचे कारण देतांना, पूर्वीच मृत झालेल्या नात्यातील एका महिलेचा हात धरल्याचे खोटे सांगून मृतकाचे बदनामी केली. त्याचे पुरावे घेऊन रंगनाथ खेडकर यांचा मुलगा किशोर खेडकर हा आरोपीने उल्लेखलेल्या महिलेचा मृत्यूचा दाखला व आरोपीची लग्नपत्रिका घेऊन ११ जून रोजी अमडापूर येथे पीएसआय प्रवीण सोनवणे यांच्याकडे गेला होता. त्यावेळी सोनवणे यांनी बोलतांना, खरे कारण जर समोर आले तर तुझ्यावर ३७६ दाखल होईल व तुझी जमानत होणार नाही. तसेच तुझ्या वडिलांची बॉडी काढतांना मला ७ हजार रुपये खर्च आला. तसेच आरोपी भरत जायभाये हा शार्प व हुशार असून मी कितीही तपास केला तरी त्याला शिक्षा होणार नाही. तुझ्या वडिलांना मारल्यानंतर तो तुलाही (किशोरला) मारणार होता, परंतु मी त्याला समजावले असे किशोरला सांगितले. त्यावरुन तपास अधिकारीच जर आरोपीच्या कृत्याची स्तुती करणार असतील आणि तपास पूर्ण होण्याआधीच आरोपी निर्दोष सुटणार असल्याचा साक्षात्कार जर सोनवणे यांना होत असेल तर निश्चितच ते आरोपीला बचावाची संधी उपलब्ध करुन देत असल्याचे निवेदनात म्हटले .
त्यामुळे आपल्या पतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याचवेळी तपास अधिकारी प्रवीण सोनवने वगळता किनगावराजा, साखरखेर्डा व अमडापुर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यातील कुणाही विरुद्ध तक्रार नसल्याचे, तसेच जर तपास वर्ग करण्यात आला नाही तर २१ जुलै रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मृतकाची पत्नी विद्या रंगनाथ खेडकर यांनी दिलेल्या या निवेदनामुळे तालुक्यासह इतरत्रही वेगवेगळ्या स्वरूपांच्या चर्चांचे पेव फुटले आहे व या खून खटल्याचा गुंता आणखीनच वादात जातोय कि मृतकाच्या पत्नीचे निवेदनाची दाखल घेतली जाते हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल .