हवामान वार्ता – शेतकरी वर्ग पेरणीकरिता व ज्यांची पेरणी झाली आहे असे आभाळाकडे पाहत आहे अशातच पाऊस लांबण्याच्या बातम्यांनी धडकी भरली असतांना १७ ते २१ जुन २०२१ पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे असा हवामान अंदाज आहे आणि हि बातमी नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे . पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे . कमी दाबाचे क्षेत्र विस्तारले तर आजपासून काही जिल्यात पावसाचा जोर वाढून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे .गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने उघडझाप दिली आहे तर हवामान खात्याने (हवामान अंदाज विभाग) पुढील काही दिवस पावसाचा खंड पडेल अशी शक्यता वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती पण आता पावसाचा जोर काही प्रमाणात वाढताना दिसत आहे . हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार आज पासून ( १७ ते २१ जुन २०२१ ) पुढील तीन ते चार दिवस ठाणे ,मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे .
मान्सून उत्तरेकडील राज्यांमध्ये गेल्याने गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला त्यानंतर कोकण मराठवाडा व विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होऊन काही भागात कमी अधिक पाऊस पडत आहे.खान्देश मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग ,मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक भागात पावसाने उघड दिल्याने सकाळपासून उन्हाचा चटका वाढला.त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. गत दोन ते तीन दिवसापासून वायव्य बंगालचा उपसागर व त्या लगतच्या भागात व मध्य अरबी समुद्र ते कोकण किनारपट्टी च्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे.
आज विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा वगळता तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे .