भिकनराव भुतेकर✍️ इसरुळ/प्रतिनिधी – गावात देवांच्या नावाने सोडलेल्या व त्यावर कोन्हाचीही मालकी नसलेल्या मोकाट जनावरांनी गावालगतच्या शेतातील उभे पिक खाऊन असंख्य शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान केले आहे त्यामुळे अगोदरच अनेक संकटांचा सामना करत असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बऱ्याच वर्षापूर्वी चिखली तालुक्यातील इसरूळ गावात कुन्हीतरी अज्ञात व्यक्तीने एक गाय देवाच्या नावाखाली बेवारस सोडली होती. परंतु ती “देवगाय” त्या व्यक्तीने नेमकी कोणत्या देवस्थानला दान करून सोडली याची माहिती संस्थान किंवा ग्रामपंचायतला पुरवली नाही. तसेच त्यावेळी ग्रामपंचायत ने त्या गाईची नोंद घेतली नाही. आजपर्यंत त्या गाईपासून उत्पत्ती होऊन गायी, वळू व लहान कालवड सहीत जवळपास ४७ जनावरे गावाभोवती मोकाट फिरत आहे. ज्यावर ग्रामपंचायत सहित कोणतेही देवस्थान आपला मालकी हक्क सांगायला पुढे येत नाही. सकाळपासून ही जनावरे गावामध्ये घरोघरी ४-५ च्या संख्येने फिरत असतात व नंतर कळपाने गावातील मोकळ्या जागेत बसत असतात.
तोच जनावरांचा कळप रात्रीच्या वेळी गावालगत असलेल्या इसरुळ व मगरुळ येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरून पिकाचे अतोनात नुकसान करत आहे. तीन दिवसापूर्वी अत्यंत गरीब शेतकरी समाधान काकडे यांच्या अडीच एकरात लागवड केलेल्या कपाशी व कॉटन प्लॉटच्या बोंड्या खाऊन झाडांची मोडतोड करत शेतातील प्रचंड नुकसान झाल्यामुळे ते हवालदील झाले आहे. ह्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने पिक नुकसानीची पाहणी करून मोबदला मिळावा तसेच लवकरात लवकर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी असंख्य नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.