बुलढाणा – राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नरेंद्र नाईक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेडनेट धारक शेतकऱ्यांच्या आणि संकरित बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पिक कर्ज वाटप करतांना दहा गुंठ्यांत हे शेतकरी घेत असलेले उत्पन्न व त्यासाठी लागणारा खर्च याचा सखोल अभ्यास कृषी विभागाने करावा अशी विनंती केली.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-12-at-21.13.19-1024x561.jpeg)
दहा गुठ्याच्या शेडनेट मध्ये बिजोत्पादन करणारे शेतकरी हे ४ महिन्यात करार पद्धतीने शेती करून जवळपास दिड ते दोन लाख रुपये उत्पन्न खरिप मध्ये आणि तितकेच पुन्हा रबी हंगामात घेतात. सदर बिजोत्पादन ची गुणवत्ता टिकविण्यासाठी अत़ीशय खर्चिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करावे लागते. त्याशिवाय कृत्रिम पद्धतीने संकर (पोलन क्रॉसिंग) करण्यासाठी महिनाभर सतत मजुर ही लागते उत्पन्न जरी शाश्वत असले तरी खर्च ही खूप येतो म्हणून बिजोत्पादनासाठी ८० हजार ते १ लाख पर्यंत कर्ज पुरवठा प्रती प्लॉट (दहा गुंठे) केला तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि करार पद्धतीने शेती असल्याने कर्जाची परतफेड ही सुरळीत आणि वेळेवर होईल.
बिजोत्पादक शेडचे विमा काढण्या संदर्भात कुठलीच ठोस योजना अजून नाही. वीस गुंठ्यांत एक शेडनेट उभारण्यासाठी जवळपास १२ लाख रुपये खर्च येतो परंतु वादळात या शेड चे नुकसान झाल्यास त्याला पुन्हा उभारण्यासाठी ४ ते ५ लाखांपर्यंत खर्च येतो त्यामुळे शेडनेट च्या विम्या संदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल कृषी विभागाने तयार करावी अशी विनंती जिल्हाध्यक्ष राजीव जावळे यांनी केली. शेड मधील पिक विमा यासंदर्भात चर्चा करून ठोस पावले उचलण्या साठी काय काय करने गरजेचे आहे या संदर्भात चर्चा केली. अधिक्षक कृषी अधिकारी श्री नरेंद्र नाईक यांनी यासंदर्भात अकोला येथील नियोजित डिव्हीजनल पॉलिसी मिटिंगमध्ये वरील सर्व विषय विचारार्थ ठेऊ असे सांगितले.
या प्रसंगी कृषी प्रकल्प अधिकारी श्री संजय जाधव, कृषी संयोजक राम वाणी, भारत कापसे, सोहम बेलोकर व मोताळा येथील नळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक श्री प्रवीण जवरे उपस्थित होते ….