Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

खरीप हंगाम 2021 साठी पिक स्पर्धा जाहीर – शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

बुलडाणा दि.22 : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत खरीप हंगामात पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

  या खरीप हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे.  पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या  सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 अर्ज असणार आहे.

स्पर्धेत दाखल करण्याची तारीख व बक्षीस

मूग व  उडीद पीकसाठी 31 जुलै, भात, ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी 31 ऑगस्ट असणार आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात देण्यात यावे.  

  पिक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप : स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस तालुका पातळी प्रथम 5 हजार रूपये, द्वितीय 3 हजार रूपये व तृतीय बक्षीस 2 हजार रूपये असणार आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पारितोषिक 10 हजार रूपये, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रूपये आहे.  विभाग पातळीवर प्रथम 25 हजार रूपये,  20 हजार रूपये व  15 हजार रूपये बक्षीस असणार आहे. तसचे राज्य पातळीवर प्रथम बक्षीस 50 हजार, द्वितीय 40 हजार रूपये व तृतीय बक्षीस 30 हजार रूपये असणार आहे.

     पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै  पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषि विभागाचेवतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.