प्लॉटच्या नोंदणी व फेरफारसाठी रक्कम घेऊन पार्टी करतांना तलाठी व मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात …
सिंदखेडराजा:- प्लॉटची नोंद घ्यायची, त्याचा फेरफार करायचा ह्यासाठी १० हजार रुपये नगदी तसेच दारुसह मटणाची पार्टी घेणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठी अशा दोघा आरोपींना बुलडाणा एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करतेवेळी दारु व मटणाची पार्टी सुरु होती. या अजब धाडीमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. असून सर्वत्र चर्चेचे पेव फुटले आहे.
खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील ४२ वर्षीय तक्रारदाराने त्याच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारावर नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथे कार्यरत मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर वय ५२ वर्षे रा. गजानन कॉलनी, खामगाव व शिरला नेमाने येथे कार्यरत तलाठी बाबुराव उखर्डा मोरे वय ३६ वर्षे रा. किन्ही महादेव, ता. खामगाव यांनी दहा हजार रुपये व दारु आणि मटण पार्टीची मागणी केली होती. यातील १० हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले आहेत. यासंबंधी तक्रारदाराने बुलडाणा एसीबीकडे येऊन तक्रार नोंदवली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
त्यानुसार काल दि. २८ मे, शुक्रवारी रात्री खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख शिवारात असलेल्या प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडी समोर मंडळ अधिकारी विलास खेडेकर व तलाठी बाबुराव मोरे या दोघांना दारू व मटणवर ताव मारताना अटक केले आहे.
ही कारवाई बुलडाणा एसीबीचे पो. उपअधिक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पो. निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान, विनोद लोखंडे , अझरुद्दीन काझी, चालक नितीन शेटे, शेख अर्शद यांनी केली आहे.
ही अजब धाड व कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, शंकाकुशंकात्मक चर्चेचे सर्वत्र पेव फुटले आहे.