महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना
आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे जिल्हा उपनिबंधक यांचे आवाहन
15 नोव्हेंबर पर्यंत चालणार विशेष मोहिम
राज्य शासनाने 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019” ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेतंर्गत 1,78,179 पात्र कर्ज खात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झालेल्या आहे. त्यापैकी 1,73,806 खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे. मात्र 4372 खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.
योजनेतील 4372 पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याने त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. त्या अनुषंगाने योजना अंमलबजावणीमधील आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकारण या टप्प्यावरील प्रलंबित कामकाज विशेष कालमर्यादेत मोहिमेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत प्रलंबित आधार प्रमाणीकरण तसेच जिल्हा व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयांच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासाठी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबतच तालुका व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांनी केले आहे.