पर्यावरणाला गृहित धरण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्याचा सर्व सजीव सृष्टीवर विघातक परिणाम होत आहे.यातूनच पर्यावरणा बाबतच्या जागृतीची गरज निर्माण झाली.म्हणूनच 1972 साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण या विषयी आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सामाजिक, राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात आला.
संपूर्ण जगात पर्यावरण साक्षरता वाढीस लागून आपला मूलाधार असलेले पर्यावरण सुरक्षित राहावे यासाठी वसुंधरेवरील प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्ष संगोपन तथा इतर पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रमांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे आवाहन मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ पर्यावरण प्रेमी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले.
वनश्री मेहेत्रे पुढे बोलतांना म्हणाले की शासन,प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते,विविध सेवाभावी संस्था व संघटणे आपापल्या परीने पर्यावरण संवर्धन करीत असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी होऊन उचित योगदान दिल्यास पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोक चळवळ होईल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरणाबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेतुन प्रत्येकाने राष्ट्रीय सण – उत्सव, थोरा मोठ्यांची जयंती – पुण्यतिथी, वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस, मैत्रीचे प्रतीक,प्रेमाचे प्रतीक, जीवनातील सोनेरी क्षण तथा कुटुंबातील मयत व्यक्तीच्या स्मृती निमित्ताने उचित ठिकाणी देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे नम्र आवाहन वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले