भिकनराव भुतेकर इसरूळ – इसरूळ येथील ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षतेमुळे गावामध्ये अस्वच्छता पसरली असुन घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मागील ८ ते १० दिवसापासून अनेक बालकांना डेंग्यूसदृश्य अशा अज्ञात तापाची लागण झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की चिखली तालुक्यातील इसरुळ हे शेवटच्या टोकाचे गाव असल्याने या गावातील झालेल्या व होणाऱ्या वेगवेगळ्या कामाच्या चौकशी साठी येणारे त्या कामासंबधीत वरीष्ठ अधिकारी पाठ फिरवतात.असे दिसून येत आहे. अशीच बाब सप्टेंबर २०२० मध्ये घडली होती. त्यावेळचे विस्तार अधिकारी जाधव यांच्या भेटीवेळी निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ग्रामसेवक रिंढे यांना सूचना केल्या होत्या पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत च्या वतीने गावातील नाल्याची एकदाही साफसफाई न केल्यामुळे व शिवाय सरपंच यांच्या घरासमोरच नालीत दगड विटा टाकून पाणी आडवल्याने त्या परिसरातील अनेकांनी त्यांचे अनुकरण केल्याचे आढळून आले. अनेकवेळा या नालीवरून शेजारी लोकांमध्ये भांडणाचे रूपांतर हाणामारीत सुद्धा झाली आहे. या भागातील ठिकठिकाणी नाल्यात, आणि लोकांच्या अंगणात पाणी व घाण साचली असून खूपच दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून मच्छराचा प्रादूर्भाव वाढला आहे. तेच घाण पाणी गावामधील ठिकठिकाणी खड्डे असलेल्या नळाच्या वॉल मध्ये शिरून लोकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील रहीवाशांच्या विशेषतः बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. बालकांना ताप येत असून वेळीच त्या पाण्याचा बंदोबस्त न केल्यास डेंग्यू , मलेरिया, अतिसार या सारख्या रोगाचा प्रसार होऊ शकतो.
कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असला तरी जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असल्याने तापेने आजारी असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांनी खाजगी दवाखान्यात धाव घेतली असून त्यांना बिलाच्या रूपाने हजारों रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. घरात पाणी शिरत असल्याने याच भागातील प्रकाश वगदे यांनी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मागील एक वर्षापासून ग्रामपंचायत ला अर्ज करूनही सरपंच व ग्रामसेवक यांनी यावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे सांगितले.
शासनाच्या वतीने दिलेल्या निधीचा वापर हा आरोग्याच्या दृष्टीने मह्त्वपूर्ण अशा उपाय योजना करण्यासाठी बंधनकारक असतो. पण ग्रामसेवक व सरपंच यांनी याकडे जाणीवपूर्वक व “अर्थपूर्ण” दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असुन अगोदरच कोरोनामुळे व महागाईमुळे पैशाच्या अडचणीचा सामना करत असलेल्या गरीबांना मोठे संकट पडले आहे. त्यावर प.स. चिखली व ग्रामपंचायत इसरुळ यांनी त्वरीत दखल घेऊन संपूर्ण गावातील नाल्यांची, हौदाची, पाण्याची टाकी,पाईप लाईन दुरुस्ती, वॉल साफसफाई करून गावातील गाजर गवत निर्मूलन, दवंडीव्दारे लोकांना आपल्या परिसराची साफसफाई याबाबत आवाहन करून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा जंतूनाशकाची धूर फवारणी करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे. आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतला यापूर्वीच सूचना दिल्या असल्याचे सांगितले. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्यावतीने काल नालीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.