कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरील नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
बुलडाणा दि. 10 : कोरोनाच्या काळात जिल्ह्यात दररोज हजारच्या वर रूग्ण निघत होते. जिल्ह्याचा रूग्ण्वाढीचा आलेख सतत चढता होता. मात्र शासन, प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आपण कोरोनाची दुसरी लाटा आटोक्यात आणण्यामध्ये यशस्वी झालो आहोत . तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची संभावना आहे. या संभाव्य तिस-या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे , असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज बुलढाणा येथे केले.
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्राप्त आठ व्हेंटिलेटर उपकरणाचे चे लोकार्पण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते नियोजन भवन समिती सभागृहात करण्यात आले होते . यावेळी मंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत राज समिती अध्यक्ष आमदार संजय रायमूलकर , आमदार संजय गायकवाड , माजी आमदार डॉ शशिकांत खेडेक र, बुलडाणा कृऊबासचे सभापती जालींधर बुधवत , जिल्हाधिकारी एस रामामूर्ती , जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, ऋषी जाधव आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. उदय सामंत पुढे म्हणाले, शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ह्या ग्रामीण भागातही असल्या पाहिजेत. यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे . त्यानुसार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आरोग्य यंत्रणा , विविध विभाग , संस्था व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण दुसरी लाट आटोक्यात आणू शकलो. आता तिसरी लाट येऊ नये यासाठी सजग प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. उत्कृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या यंत्रणेचा ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रूग्णांसाठी उपयोग व्हावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. लोकार्पण सोहळ्यानंतर मंत्री महोदयांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.