Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

रसा तळाला . . की राजकारण पाताळाला . ? नव्हे बहुदा….सत्तेवरील लोणी खाणारे…राज (रोष)कारण…

बुलढाणा – बुलढाणा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महामार्गावरील अपघातातील मृतांच्या अंतिमसंस्कार व दुपारचा शपथविधी यावरील फेसबुक पोस्ट चे माध्यमातुन अनेकांच्या भावनांना शब्दातुन प्रवाहित केले अशी चर्चा ?

                            संकट मोचक ? ? ? की .  . . . . . . . . सत्ताचुंबक ? ?

“अंक पहिला”
एखाद्या प्रख्यात सिने पटकथा लेखकालाही लाजवेल अशी स्क्रिप्ट फसवणीस लिहू लागले आहेत. ही कथा कुटनीती अनुषंगिक असली तरी यातील सस्पेन्स वाखाणण्याजोग आहे ! मागील( उठाव×गद्दारी) कथेत थ्रिल,सस्पेन्स दीर्घकाळ कायम ठेवत एकीकडे सुरत-गोहाटी-गोवा, तर दुसरीकडे कायदा-कोर्ट-सभापती-सरकार पातळीवर ॲक्शन देखील होती. करमणुकीत कुठे पडू नये म्हणून स्क्रिप्ट बाहेर जाऊन विदूषकी डायलॉगांची पेरणी करण्यात आली होती. यातून अजरामर डायलॉग जन्माला आला -“काय झाडी ? काय डोंगर ? काय हॉटेल ? एकदम ओके” !

पुढे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा नाहक राजीनामा दिल्यामुळे सरकार गेलं व विधानसभा अध्यक्ष (उपाध्यक्ष) यांच्या यांनी उभारलेल्या कारवाईच्या अस्त्राला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या संरक्षणात ED (एकनाथ+देवेंद्र) सरकार सत्तेत आलं. शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीस यांचे ना..ना..×हांजी..हा नाट्य, समर्थकांना फुटणारे हुंदके स्क्रिप्टला इमोशनल फील देऊन गेला. नाट्यमय घडामोडींनंतर 30 जून 2022 शिंदे फडणवीस सरकार अखेर सत्तेत आले.

पुढे “अनुसूचि 10-सुप्रीम कोर्ट- तारीख पे तारीख-निकाल- दोन्ही पार्ट्या म्हणतात आमचाच विजय” – या सगळ्या प्रकरणाचा चोथा चघळून एव्हाना सगळेच बोर झालेले होते, तर बेकायदेशीर म्हणणाऱ्या सरकारने आपले एक वर्ष देखील पूर्ण केले आहे.———- मध्यंतर

“अंक दुसरा”
गेल्या वर्षभरात “पन्नास खोके,एकदम ओके-विश्वासघात- पाठीत खंजीर खुपसला-मिंधे-गद्दार’ इत्यादीचा कल्लोळ काही केल्या शांत होत नाही.या सर्व पर्सेप्शनला तडा देण्याकरता “उठाव-विकास-डबल इंजिन सरकार-हिंदुत्व” असा कांगावा करूनही उपयोग नाही हे समजल्यानंतर व भाजप एकामागे एक सर्वे करीत असताना असे निदर्शनास आले की आगामी लोकसभा व विधानसभेत मोठा फटका बसणार हे निश्चित आहे,तेव्हा दिल्लीश्वरांनी वारंवार फटकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी स्क्रिप्ट लिहायला घेतली. या सस्पेन्स . . . विभीषण वगैरे वगैरे या पटकथेबाबत संपूर्ण माहिती यथावकाश आपल्या सर्वांना विविध अँगलने निश्चित मिळेल आणि जर आपल्याजवळ आपली सत्सदविवेकबुद्धी जागृत असेल तर निश्चित काय ते कळेल,मात्र तूर्तास या स्क्रिप्ट मध्ये ऐनवेळी जो अडथळा आला त्याचा हा संदर्भ (ॲक्शन शॉट).

1 जुलै 2023 शनिवार एक वाजून 30 मिनिटांनी शिंदे फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्गावर बस उलटून अपघात 25 जणांचा होरपळून मृत्यू , मृतदेहांचा कोळसा ही बातमी धडकली (11 डिसेंबर 22 ला सुरू झालेल्या समृद्धी मार्गावर गेल्या सात महिन्यात आतापर्यंत 500 अपघात तर सुमारे 200 बळी गेलेले आहेत).हाती घेतलेले ऑपरेशन लोटस दीड दिवसावर आले म्हणून “रात्र वैऱ्याची आहे ” असा जागता पहारा देणाऱ्या फडणवीसांच्या कानी सदर घटना रात्रीच तात्काळ पडली. अथक प्रयत्नांनी ऑपरेशन लोटस निश्चित केलेल्या वेळी व तारखेत होण्यास अडथळा येता कामा नये , या दिशेने विचारचक्र फिरायला लागली.मग त्यांना आठवले त्यांचे व्यक्तिगत संकटमोचक नामदार गिरीश महाजन ! त्यांनी तेवढ्याच रात्री गिरीश भाऊंना फोन केला आणि तातडीने घटनास्थळी पाठवले,तर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधून उद्या आपल्याला गेलंच पाहिजे अशी गळ घालीत बुलढाणा जिल्ह्याचा दौरा आखला.

                                           सकाळी प्रशासन डोळे चोळत असतानाच मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची माहिती येऊन धडकली. तिकडे सर्वात आधी मोक्यावर पोचून सरकारच्यावतीने गिरीश भाऊंनी सूत्रे आपल्या हातात घेतली. मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री आले शिरस्ताप्रमाणे अपघात स्थळाला भेट दिली मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी जाणे व जमलेल्या आप्त नातेवाईकांच्या सांत्वनाकरीता बुलढाण्याला येणे व औरंगाबादला जाणे वेळखाऊ असल्याने व ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर प्रवास शक्य नाही म्हणून, परस्पर देऊळगाव राजा येथे जखमींची भेट घेऊन सोपस्कार पूर्ण करीत  स्वारी मुंबईला ऑपरेशन लोटस मिशन करिता रवाना झाली. तारीख होती दोन जुलै रविवार. जाता जाता फडणवीसांनी गिरीश महाजनांना सूचना केली "सकाळी दहाच्या आधी सर्व आटपा........" दुसऱ्या अंकातील सस्पेन्स वरील पडदा उठवण्याची स्क्रिप्ट फडणीसांच्या पोटी होती ती त्यांनी महाजनांच्या कानी घातली आणि पहिलेच ॲक्शन मोडवर असणारे महाजन सुपरमॅन म्हणून कामाला लागले व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका नेहमीप्रमाणे च होती. त्यांनी प्रशासनाला कोणत्या सूचना दिल्या, असे काही ऐकिवात नाही. पालक(मंत्री) म्हटल्यावर त्यांनी जे जे करायला हवे होते तेथे सर्व गिरीश महाजन यांनीच केले. कदाचित या स्क्रिप्टची कुणकुण गुलाबराव पाटलांच्या कानी आल्यामुळे व याच माजी उपमुख्यमंत्री,अर्थमंत्र्यांवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड करून उठावाचा देखावा तयार केला तेच आता सत्तेत मोठे वाटेदार होणार म्हणून आपली अस्वस्थता जाहीर होऊ नये म्हणून बहुदा ते भूमिगत झाले असावेत.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबईला रवाना झाल्यानंतर नामदार गिरीश महाजन यांनी बुलढाणा मुख्यालयी मुक्काम ठोकला. नातेवाईकांशी संपर्क साधला. प्रशासन कामाला लावले. प्रतिक्रिया देखील दिल्या. मिडिया पुढे येत सरकार सर्वतोपरी काम काम करत आहे, हे दर्शविले. महाराष्ट्रात रेल्वेजाळे कमी असल्याने सर्वसाधारण सर्वच ट्रॅव्हल्स ने प्रवास करतात ही घटना आपल्या सोबत ही घडू शकते याची जाणीव व अपघाताचे स्वरूप बघता महाराष्ट्रभर देशभर मोठी हळहळ सर्व स्तरातून व्यक्त होत होती, आप्त नातेवाईकांचा आक्रोश माध्यमातून घरोघरी पोहोचत होता. नेमके हेच चाणाक्ष फडणवीसानी हेरले होते,म्हणून कदाचित गिरीश महाजनांना त्यांचे परममित्र देवेंद्र जी म्हटले असतील “गिरीश कुठल्याही परिस्थितीत सकाळी दहाच्या आधी सर्व आटोपशील…..हं “
गिरीशभाऊंनी प्रशासनाकरवी सर्व मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मृतदेह आपापल्या गावी गेले तर वेळ लागेल किंबहुना मृतदेहांची अवस्था बघता सामूहिक अंत्यसंस्कार केलेले बरे हा शहाणपणाचा योग्य निर्णय त्यांनी घेतला व सर्वांच्या गळी उतरविला. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला भेटले,सांत्वना दिली. सामूहिक अंत्यसंस्काराला राजी केले. त्यांच्या भावना सांभाळून जे जे धार्मिक विधी संभव आहेत ते सर्व करण्याची तयारी दर्शविली, “आम्हाला मृतदेह आमच्या गावीच घेऊन जायचा आहे” असे म्हणणाऱ्या नातेवाईकांना समजून सांगितले. रात्रीच अंत्यविधी उरकून घेण्याचा देखील मुद्दा बराच वेळ गिरीश महाजन यांनी लावून धरला, उद्या सकाळी पावसाची शक्यता आहे नाहक फजिती होईल ! असे देखील नातेवाईकांना सांगून बघितले मात्र एका मृतदेहाचा नातेवाईक अडून बसल्यामुळे रात्रीच अंत्यविधी होऊ शकले नाही. तेव्हा सकाळी 8 वेळ ठरवायची होती मात्र लवकर होईल, म्हणून 9 वाजताची वेळ मूकरर केली ( कारण दहाच्या आत सगळे आटपायचे होते). 25 मध्ये एक मुस्लिम महिला होती तिच्याही नातेवाईकांची समजूत काढून होकार मिळण्याच्याच क्षणाला मृतदेहाची ओळख पटली आणि 24 अग्निसंस्कार व एकाचा दफन विधी ठरला.

इकडे नातेवाईक पोहोचण्याकरता अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी विलंब होत चालला होता आणि गिरीश भाऊंची अस्वस्थता क्षणोक्षणी वाढत होती,तिकडे ऑपरेशन लोटस अडून बसले होते. हॉट लाईन वर अपडेट दिला जात होते . अंत्यविधी आधीच शपथविधी उरकला तर टीकेचे झोड उठेल, हे हेरून असणारे फडणवीस शांत डोक्याने राजभवनातील दरबार हॉल सजवत होते. सोबतच अजित दादांना किती आमदार झाले विचारत असावेत. प्रसंगी वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध अजितदादा ही अजून किती वेळ लावता ? म्हणून ओरडत असावेत.मात्र मोक्यावर ही सर्व तारेवरची कसरत करणारा किंबहुना हाय व्होल्टेज ड्रामाचा केंद्रबिंदू होता गिरीशभाऊ महाजन.

रविवारी रात्री उशिरापर्यंत जागून दोन वाजता झोपी गेलेले गिरीश भाऊ सकाळी आठ वाजता सामान्य रुग्णालयात पोहोचून व्यवस्था बघत होते, आम्हाला आपलं याचं आपसूक कुतुहल व आश्चर्य. अंतिम संस्काराच्या वेळी सर्व लगबग गिरीशभाऊच करीत होते. मध्ये मध्ये मोजके व महत्वाचे फोन कॉल बाजूला जाऊन अटेंड करत होते. (संभवता मुंबई येथून विचारणा होत असावी) नातेवाईकांना मुखदर्शन, पिंडदान ही प्रक्रिया स्वतः गिरीशभाऊच संचलित करीत होते. आम्हालाही पदोपदी खूप कौतुक व कृतज्ञता वाटत होती.एवढा मोठा मंत्री कसं काम करतोय बघा ! !, पालकमंत्री गायब आहेत मात्र गिरीश भाऊच सर्व जबाबदारीने पार पडत आहेत ही चर्चा अत्यंत शोकाकुल वातावरणात ही स्थापित झाली होती.

गिरीशभाऊ तसा रांगडा माणूस लोकांच्या मदतीला जाणे हा त्यांचा स्वभाव असल्याने ,अगदी बुलढाणा लागून त्यांचा मतदार संघ असल्याने ज्ञात आहे, इथे त्यांची तीच भूमिका असावी, नाहीतर प्रशासनाने अंत्यसंस्काराला अजून दोन-चार दिवस लावले असते. त्यांच्यामुळेच ताबडतोब अंत्यसंस्कार झाले हे खरे. त्यांची लगबग इतकी होती की मृतदेहांना अग्नीडाग देण्याकरताही तेच स्वतः पुढे सरसावले आणि अतीशीघ्र गतीने सुपरमॅन भाऊ मुंबईत शपथविधीतही सहभागी झाले!इथे बुलढाणा स्मशानभूमीतील विधी पार पाडून,तिथे राजभवनातील इव्हेंटला ते पोहचले.

शपथविधी आधी 24 जणांवर अंत्यसंस्कार तर शपथविधीनंतर एक दफन विधी.असा दुसऱ्या अंकातील पहिल्या प्रवेशावर पडदा पडला.
रसा तळाला . . .की
राजकारण पाताळाला . ? ?
नव्हे बहुदा …. ?
सत्तेवरील लोणी खाणारे…… राज (रोष)कारण…..

Leave A Reply

Your email address will not be published.