जळगांव ते जामोद रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
गजानन सोनटक्के
जळगांव जा तालुक्यातील दोन मोठी व महत्वाची गावे असलेल्या सूनगाव व जामोद रस्त्याचे काम 2 दिवस अगोदर सुरू झाले आहे.
परंतु या रस्ता बांधकामावर नेमके कुणाचे लक्ष आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्याचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे.बांधकामामध्ये डांबराचे प्रमाण नगण्य असून 2 दिवसातच हा रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे.या बाबत सूनगाव येथील पत्रकार मंडळींनी व काही सुज्ञ नागरिकांनी कामावरील देखरेख करणाऱ्याला हटकले असता रस्त्याचा ठेकेदार हा अतिशय मोठा माणूस आहे व अभियंता साहेब त्यांना काहीच म्हणणार नाही असे संशय व्यक्त करणारे विधान काही नागरिकांसोबत बोलताना त्याने केले.त्यानंतर गावातील पत्रकार मंडळींनी मुख्य अभियंता पुंडकर यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता रस्त्याची जाडी 20 एम.एम.पाहिजे असे सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र रस्त्याची जाडी ही खूपच कमी असुन डांबराचे प्रमाण सुद्धा कमी आहे. यावरून अभियंता पुंडकर यांचे कामावर लक्ष नसल्याचे दिसून येते व ठेकेदारासोबत त्यांचे संगनमत झाले असून त्यांच्या संमतीने रस्ता निकृष्ट दर्जाचा होत आहे असा संशय व्यक्त होत आहे.रस्त्यावर नंतर सिलकोट येणार की नाही,साईड शोल्डर भरले जाणार की नाही याबाबत सुद्धा अनिश्चितता निर्माण झाली आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे व रस्ता बांधकाम सुस्थितीत व्हावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.