मोकाट गुरांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिले सरपंच सचिव यांना निवेदन..
कोंढवाड्याची दुरावस्था
गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेत शिवारामध्ये गावातील मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून शेतकऱ्यांचे उभे पीक पायदळी तुडवीत ही जनावरे मध्यरात्री शेतकऱ्यांचे उभे पीक खात असून मोठ्या प्रमाणात नुकसानही करीत आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू हरभरा मका टरबूज कांदा यासह विविध पीके पेरलेली असून या मोकाट गुरांमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होत आहे. गावामधून दररोज मध्यरात्री 15 ते 20 जनावर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पूर्ण पीक खात असून यामुळे शेतीतील उत्पन्न काढणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी या मोकाट जनावरांच्या मालकांना भेटून त्यांच्या समस्या सांगितल्या असता गुरांचे मालक काहीही केल्या त्यांची जनावरे बांधत नसून त्यांना ग्रामपंचायत ने योग्य ती समज देऊन त्यांची गुरे घरी बांधून सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. सुनगाव ग्रामपंचायत ने मोकाट गुराढोरांसाठी कोंढवाड्याची निर्मिती केली होती. परंतु या कोंढवाड्याची अतिशय दुरावस्था झाली असुन ग्रामपंचायत ने कोंडवाडा दुरुस्त करून त्या ठिकाणी मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु कोंढवाड्याची बिकट परिस्थिती पाहता ग्रामपंचायत मोकाट जनावरांना पकडून कुठे बंदिस्त करणार असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे व ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केलेले आहे व ग्रामपंचायतने पुरेपूर लक्ष देऊन या कोंढवाड्यातील दुरुस्ती करावी अशी मागणी सूनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगळे यांनी केली आहे