सिंदखेडराजा: शहरातील वीज समस्या वाढली असून दिवसभरात अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.या संदर्भात वीज ग्राहकांनी वीज अभियंत्यांना निवेदन देवून तत्काळ वीज समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
शहरात दिवसभरात अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो तर काही भागात उच्च दाबाने वीज पुरवठा होत नाही.अनेक महिन्यांपासून या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून.वीज वितरण चे अधिकारी,अभियंते या संतापाचा कडेलोट होण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहरात अनेक जनित्र आहेत मात्र त्याची देखभाल दुरुस्ती वेळेत होत नाही.शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वीज वितरण कंपनी पुढील काही वर्षांचे नियोजन का आखात नाहीत असा प्रश्न आता नागरिकांकडून तसेच राजकीय पक्षांकडून विचारला जात आहे.
शहरातील वीज समस्येमुळे घरगुती वीज ग्राहक आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.वारंवार वीज पुरवठा खंडित होणे,वीज पुरवठा उच्च क्षमतेने न होणे या प्रकारामुळे घरातील वीज उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या संदर्भात बुधवारी संतप्त वीज ग्राहकांनी वीज वितरणाच्या उप अभियंता एन. एम.खान यांना निवेदन दिले असून शहरातील तसेच शिवाजीनगर टी पॉइंट येथील वीज समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली असून.येत्या पंधरा दिवसात वीज समस्या न सोडविल्या तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी. सिद्धार्थ जाधव,राजेंद्र अंभोरे,मनोज घातोळकर,शिवा पुरंदरे,कैलास मांटे,महेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.