कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कौतुक करावे तेवढे थोडेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जय्यत तयारी करणार नागरिकांनी काळजी घेण्याची गरज विकासकामांसाठी निधीची तरतूद करणार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
सिंदखेडराजा ( दिसना ) :- वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या कोरोना संसर्गाची भीती आजही कायम आहे. पहिली लाट जाऊन दुसरी आली. ती नियंत्रणात येत असतांनाच तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाचे नियम व वैयक्तिक जीवनात त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन करीत आशासेविका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आदिंनी संसर्गाच्या कठीण काळात केलेल्या कार्याबद्दल करावे तेवढे कौतुक व सन्मान कमीच असल्याचे तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
आज दि. २७ जून, रविवारी तालुक्यातील साखरखेर्डा येथे मानतकर परिवारातर्फे चिसौकां वैष्णवी राधिका गोपाल मानतकर व चि. अमोल पुष्पा विष्णू बोरे यांच्या विवाहपूर्व आयोजित “सत्कार कोरोना योद्ध्यांचा” ह्या “स्तुत्य” कार्यक्रमात डॉ. शिंगणे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुखदेव राणूजी मानतकर तर जि. प. गटनेते रामभाऊ जाधव, सरपंच दाऊद कुरेशी, पंचायत समिती सभापती पती गजानन बंगाळे, त्र्यंबकराव रिंढे, माजी सरपंच कमळाकर गवई, ग्रा. पं. सदस्य सय्यद रफीक, शेख युनुस, दिलीप बेंडमाळी, इब्राहिम शाह औषध निर्माता संघटनेचे प्रदेश सचिव अनिल नावंदर, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आदि प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलतांना अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले की, कोरोनावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. फक्त आणि फक्त लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. वर्षभरापूर्वी २०० किमी अंतरावर कोरोनाचा रुग्ण असला की इकडच्या मंडळींच्या मनात धस्स व्हायचं. तेंव्हा त्या रुग्णाची व्यवस्था लावण्यासोबतच त्याच्या संपर्कात आलेले आदि सर्व प्रकारचे प्रयत्न केल्या जायचे. कोरोनाच्या त्या अत्यंत भीतीदायक व गंभीर प्रसंगी जुजबी संरक्षण उपलब्ध असतांनाही आशासेविका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, रुग्णवाहिकेचे चालक, डॉक्टर्स यांच्यासह फ्रंटलाईन यंत्रणेतील प्रत्येक घटकाने अतिशय मजबूतपणे व धीराने जनतेच्या आरोग्यासाठी सर्व्हेक्षणाचे आपले कार्य जारी ठेवले, त्यातून आढळून आलेल्या रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी त्यांचा सत्कार करताना अभिमान वाटतो व आजपर्यंत सुरु असलेल्या त्यांच्या कार्याबद्दल करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याचा विशेष उल्लेख डॉ. शिंगणे यांनी केला.
आशासेविकांचे जे प्रश्न व त्याला अनुसरुन ज्या मागण्या आहेत. त्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र त्यापुढे जाऊन अन्न व औषध प्रशासन खात्याचा मंत्री म्हणून आपण स्वतः व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ह्यासंदर्भात अर्थमंत्र्यांकडे मागणी लावून धरली असून, त्यातून महाविकास आघाडी आपल्याला असे हमीवजा आश्वासन डॉ. शिंगणे यांनी दिले. त्याप्रसंगी आशासेविका व उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत डॉ. शिंगणे यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.
कोरोना संसर्गाची पहिली लाट आपण पाहिली, दुसरी लाट आली नव्हेतर अजूनही काही ठिकाणी सुरुच आहे. तिसरी लाटही येणार असून त्यामध्ये लाखो लोक आजारी पडणार आहेत. याचवेळी डब्ल्यू. एच. ओ. ने सांगितल्याप्रमाणे कोरोना आयुष्यभर सोबत घेऊन जगावे लागण्याचीही दाट शक्यता आहे, त्यामुळे शासनाच्या नियमांची कास धरावी. जर विश्वास बसत नसेल तर ज्याला कोविड होऊन गेला त्या व्यक्तीला भेटा व ती काय म्हणते ते ऐका व यातून त्रिसूत्री वापरत प्रत्येकाने स्वतः निक्षून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले.
येत्या काळात कोरोनाशी लढण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करणार असून, प्रत्येक रुग्णाला बेड, औषधी, इंजेक्शन, ऑक्सिजन इत्यादि वेळेवर मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार असून त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे ठामपणे विशद केले. याचवेळी कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आली तर घरी न बसता तपासणी व चाचणी करुन वेळीच रुग्णालयात दाखल व्हावे, कारण मृत्युदर वाढण्यासाठी, आजार अंगावर काढत चारपाच दिवस घरी बसणारे कारणीभूत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरोमायसिस मुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आता कोरोनाचे डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिएंट आलेत. त्यामुळे तर आबालवृद्धांना बाधा पोहचण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोरोना होऊ न देणे हाच मार्ग सुलभ असल्याचे व त्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर व सुरक्षित अंतर आदिचा अवलंब करावा असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
रोजच्या जीवनात संपत्ती कमावण्यापेक्षा ‘सर सलामत तो पगडी पचास’ ह्या उक्तीनुसार आपण जीवंत कसे राहू ह्यासंदर्भात टाटांनी जे म्हटले आहे त्याचा अवलंब करावा, असेही सांगितले.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. आपण मला निवडून दिले. ३० डिसेंबर रोजी मंत्री म्हणून शपथ घेतली. ६, ७ जानेवारीला खातेवाटप झाले. आणि मार्चमध्ये कोरोना संसर्गाची सुरुवात झाली. तेंव्हापासून आतापर्यंत कोरोना एके कोरोना एवढ्याच विषयावर काम राज्यशासनाच्या मागे लागले. त्यामुळे राज्यशासनाचे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कमी झाले. यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीचा परिणाम होऊन विकासकामांना मर्यादा आल्या आहेत. तरीही साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासकामांची जी आश्वासने जनतेला दिलेली आहेत, ती निश्चितच पूर्ण करण्यात येतील. त्यामध्ये गावातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्यक्रम देण्यात यावा, त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच गावातील इतरही विकासकामे टप्प्याटप्प्याने करण्यात यावेत असेही निर्देश दिले.
ह्या कोरोना योद्ध्यांचा झाला सत्कार ..
वैद्यकीय सफाई कर्मचारी छायाताई गोढाले, सफाई कामगार योगेश बाबुलाल गोढाले, वीज कंपनी कर्मचारी चेतन इंद्रपाल डागोर, रुग्ण कल्याण समितीचे गणपत अवचार, पत्रकार से. नि. प्राचार्य डी. एन. पंचाळ, सरपंच दाऊद कुरेशी, पॅथॉलॉजीचे सुरेश देशमुख, केमिस्ट ओम अग्रवाल, पशु वैद्यकीय अधिकारी के. डी. शिंगणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुसे, वैद्यक शेषराव देशमुख, ठाणेदार जितेंद्र आडोळे
बुरकुल कुटुंबियांना सानुग्रह मदत …
आरोग्य उपकेंद्रात कर्तव्यावर असतांना सर्पदंशाने मृत्यू झालेल्या गीता बुरकुल यांच्या वारसांना मदत म्हणून कर्मचाऱ्यांनी जमा केलेले ८४ हजार रुपये, अदिती अर्बन परिवारातर्फे एक हजार रुपये निधी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी १० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी डॉ. नंदकिशोर मानतकर, गोपाल मानतकर, भागवत मानतकर, मंजुषा मानतकर, राधिका मानतकर, लक्ष्मी मानतकर, अंकुर मानतकर, प्राचार्य दिलीप मानतकर, पुरुषोत्तम मानतकर, मधुकर मानतकर, शरद मानतकर, राजेश्वर मानतकर, सृजल मानतकर, शरद इंगळे, कु. स्वाती झिने, सादिया खातून साहेब खान,भारत घोडके आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला वैद्यकीय, औषधी, पत्रकारिता, शासकीय यंत्रणा आदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व शासकीय नियम पाळण्यात आले.