त्या पत्रकारांना दिवा लावून अर्पण केली श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष वेधले जाऊन मदत मिळण्याची मूक मागणी
बुलडाणा :- फ्रंट लाईन वर्कर म्हणून वृत्त संकलनाचे काम करतांना कोरोना संसर्ग होऊन मृत झालेल्या राज्यभरातील पत्रकारांना आज दि. ३० मे, रविवारी रात्री ७.३० वा. राज्यभर ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ह्यातून शासनाचे लक्ष वेधले जाऊन, निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळावी अशी मूक मागणी दिसून आली.
महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत १२७ च्या वर पत्रकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.कोरोना मुळे निधन झालेल्या पत्रकार यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज दि. ३० मे, रविवारी रात्री ७.३० वा. एक दिवा पेटवावा किंवा मेणबत्ती पेटवावी.असे आवाहन राष्ट्रव्यापी पत्रकार संघटना असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, विश्वस्त गणेश कोळी, अतुल होनकळसे, युयुत्सु आर्ते, प्रदेशाध्यक्ष दीपक नागरे, महिला संपर्क प्रमुख रुपाली जाधव, प्रदेश सरचिटणीस हनुमंत देसाई, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रदेश संघटक नितीन गुंजाळकर व सर्व विभागीय अध्यक्ष आदिंनी केले होते.
त्याला अनुसरुन साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा येथील पत्रकार व प्रदेश अध्यक्ष दीपक नागरे यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणी अनेक पत्रकारांनी तसेच संवेदनशील नागरिकांनी आपापल्या ठिकाणी एक दिवा किंवा मेणबत्ती पेटवून फ्रंट लाईन वर्कर म्हणून वृत्तांकनाचे काम करतांना कोरोना संसर्गामुळे निधन झालेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण केली.यातून राज्य शासनाचे लक्ष वेधले जावे व निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना भरीव मदत मिळावी अशी मूक मागणी ह्या उपक्रमात दिसून आली.