बुलडाणा,: जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातंर्गत जिल्हा अंमलबजावणी पथकाने धुम्रपान प्रतिबंध व कोटपा कायद्यातंर्गत धडक दंडात्मक कारवाईची मोहिम 24 फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. ही मोहिम जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या आदेशान्वये, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा शहरात राबविण्यात आली.
या मोहिमेतंर्गत विविध ठिकाणी कारवाई करीत 4 हजार 400 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर कार्यवाहीसाठी जिल्हा अंमलबजावणी पथकामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सोळंकी, श्री. वसावे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. गवारगुरू, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. भोसले, समुपदेशक श्री. सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्री. आराख यांचा समावेश होता.