मेहकर रवींद्र सुरुशे : बालविवाहाची माहिती पोलिसांत दिल्याचा आरोप करून ३२ वर्षीय युवकाच्या घरावर ७ जणांनी हल्ला चढवला . मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली . चाकूने त्याच्या लहान भावावर हल्ला करून जखमी केले . ही घटना काल , १ ९ जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली . हल्ल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर मध्यरात्री पुन्हा तक्रारदार युवकाच्या घरावर दगडफेक झाली . त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आले असून , हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे . गोपाल नारायण आमले , अन्सार खाँ नबु खाँ पठाण , सुरेश नारायण आमले , अशोक सखाराम पायघन , रामा सुभाष आमले , दिलीप पायघण , योगेश पायघण ( सर्व रा . देऊळगाव साकर्षा , ता . मेहकर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत . अश्विन नारायण पायघण ( ३२ , रा . देऊळगाव साकर्षा ) या युवकाने जानेफळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे , की काल सायंकाळी गोपाल आमले व त्याच्या साथीदारांनी घराजवळ येऊन शिविगाळ सुरू केली .अन्सारने त्याच्या लहान भावाच्या कानाखाली मारली . अश्विन त्यांना समजावत असताना अन्य आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली . गोपाल आमले याने चाकूने अश्विनचा भाऊ मंगेशवर हल्ला चढवला . यात मंगेश जखमी झाला .
त्यानंतर आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली , असे तक्रारीत म्हटले आहे . त्यावरून पोलिसांनी ७ हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला . मध्यरात्री पुन्हा हल्ला पोलिसांत तक्रार करून घरी परतल्यानंतर अश्विनच्या घरावर मध्यरात्री पुन्हा हल्ला झाला . घरावर दगडफेक करण्यात आली . त्यामुळे हे कुटुंब दहशतखाली आले आहे . बालविवाहाची माहिती आपण दिल्याचा संशय हल्लेखोरांना आहे . माजी तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष आपल्याला ही माहिती पोलिसांनीच पुरवल्याचे सांगतो . त्यातूनच कुटुंबावर हा हल्ला होत असल्याचा आरोप अश्विनने केला आहे . हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करून आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे , अशी मागणी त्याने केली आहे .