बुलडाणा दि.16 : – ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत भूमीहीन पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणे, घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे, मनरेगा अंतर्गत प्रशिक्षण, जल जीवन मीशन, स्वच्छता मिशन व सौभाग्य योजनेचा घरकुल लाभार्थ्यांना लाभ देणे आदी कामे करण्यात आली. घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना 15 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधीक स्वरूपात चावी देवून ई गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, सभापती सर्वश्री रियाजखा पठाण, राजेंद्र पळसकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय ई गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यादरम्यान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे निवडक लाभार्थ्यांना चावी देवून ई गृहप्रवेश करण्यात आला. तर त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थी दिनकर जाधव खुपगांव, कासाबाई शेळके चांडोळ, सुभाष काकफळे चांडोळ, भाऊराव चित्ते नांद्राकोळी यांना घराची चावी देवून ई गृहप्रवेश करण्यात आला. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी मानले.