इसरुळ प्रतिनिधी भिकनराव भुतेकर
चिखली तालुक्यातील इसरुळ गावाची “सैनिकांचे गाव” म्हणून जिल्हाभर ओळख आहे. या गावातील सैनिकांचा १९७१ च्या युद्धात व “कारगिल” च्या विजयात सहभाग होता व त्यांच्याच देशप्रेमाच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाने आजही येथील २४ सैनिक देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहे. आपले जवान देशाचे रक्षण करत आहे म्हणून तर आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदराची भावना असणे आवश्यक आहे. आणि तशी भावना प्रत्येकाच्या निर्माण व्हावी या उद्देशातुनच इसरूळ येथे स्वतंत्र दिनाच्या दिवशी गावातील सुट्टीवर आलेल्या सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कारगिल युद्धात सहभाग असणारे बाजीराव भुतेकर , सुभेदार शिवाजी भुतेकर, सुभेदार अशोक भुतेकर, सुभेदार राजेश कत्ते, सुभेदार गणेश भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील अनेक तरूण सैन्यात भरती झाले. त्यामुळे गावातील तरुणांना आवड निर्माण होऊन भरतीसाठी प्रॅक्टीस करत आहे. त्यामुळे गावातील सर्वांनाच सैनिकाविषयी आदर आहे.
यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत यावर्षी ध्वजारोहणचा करण्याचा मान आपल्या गावातील सुट्टीवर आलेल्या सैनिकांना द्यावा याविषयी विचार मांडले असता त्याला दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक, तसेच गावातील ग्रामस्थ, शाळा समिती अध्यक्ष, सदस्य यांनी या विचाराचे स्वागत करून सर्वांनुमते ध्वजारोहणाचा निर्णय घेतला. भारतीय सैनिक जिवाची पर्वा न करता सीमेवर देशवासीयांच्या सुरक्षतेसाठी शत्रूशी दोन हात करत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून स्वातंत्र्यदिनी इसरूळ येथील संभाजी राजे विद्यालयात नायब सुभेदार नवनाथ कत्ते (दिल्ली )तर जि.प.माध्यमिक शाळेत नायक शरद भुतेकर (झांसी )व दिगंबर भुतेकर (सिक्कीम) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ते सर्व त्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे हे विशेष. यावेळी संभाजी राजे विद्यालयाचे मुख्याध्यापक राठोड सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक,कर्मचारी व जि. प. चे खेडेकर सर, आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्यासह शाळासमिती अध्यक्ष, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, आदी गावकरीमंडळी उपस्थित होते.
या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.