
सिंदखेडराजा प्रतिनिधी :- तालुक्यातील आडगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील लोकांना लस देणे व मनमानी करीत इतरांना अरेरावी तसेच मगृरीने उर्मटपणाची वर्तणूक देणे हा प्रकार सुरुच आहे. तर काही निवडक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आरोग्य केंद्राचे मुख्यालय हे १४ किमी अंतरावर सिंदखेडराजा येथे असल्याचा अजबगजब प्रकार असल्याने अनेक बाबी अधुऱ्याच राहत आहेत. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या लसीकरण मोहीम सुरु असल्याने प्राथमिक केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळेच तेथील सोयीसुविधा व अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्तणूक हे नजरेस पडत आहे. त्यात आडगाव राजा येथे नवीन टोलेजंग इमारत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे “दुरुन डोंगर साजरे” ह्या उक्तीप्रमाणे बाहेरुन देखणे वाटत असले तरी आत मात्र नकोसे करणारे चित्र प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे अनेकांना अनुभवायला मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत केंद्राच्या कार्यकक्षेतील नागरिक वाऱ्यावर सोडून बाहेरील देवाणघेवाणीतून आणत अनेकांना लस दिली गेल्याची माहिती आहे. त्या यादीची सखोल चौकशी केल्यास सत्य समोर येऊ शकते. ह्या आरोग्य केंद्राचे कार्यालय सिंदखेडराजा येथे आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही.
म्हणून कर्मचारी मनमानी कारभार करीत रुग्णांशी उद्धटपणे वागत उर्मटपणे त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ईथे शेळके नामक कर्मचाऱ्याने यादीच फाडल्याचा प्रकार घडला होता. कार्यालय सिंदखेडराजा येथे असल्याने आरोग्य विभागाकडून येणारे साहित्य हे सिंदखेड राजा कार्यालयातच धूळ खात पडते व त्याचा तातडीने व प्रत्यक्ष उपयोग होत नाही. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे हे देऊळगाव मही येथून येणे जाणे करतात , त्यात वर्दडीचाही प्रभार असल्याने कुणी त्यांच्याशी संपर्क केला तर दोन्हीपैकी एका गावाचे नाव सांगणे सोयीचे जाते. आणि जर जास्ती भानगडी झाल्या तर ते आडगाव राजा येथे येत असल्याची परिस्थिती आहे. हे सर्व प्रकार वर्षानुवर्षे चालू असल्याने सगळे संगनमताचे द्योतक असल्यासारखे दिसते . त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ह्या सर्व बाबींची सखोल व तात्काळ चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
डॉ. शिंगाडे हे अनेक वर्षांपासून येथे असल्याने काही त्यांच्याच मर्जीतील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर दिलेले आहे. आपमतलबी पणातून त्यांना आडगाव राजा येथे ठेवण्यात येत नसल्याच्या शंकायुक्त चर्चाही वेळोवेळी होत असतात.
रुग्णांच्या रक्त लघवीचे नमुने घेऊन, त्याच्या अहवालानुसार निदान व पुढील उपचार करावे लागते, मात्र या कार्यासाठी असलेली व्यक्ती महिनोनमहिने येत नसल्याने रुग्णाच्या रक्त लगवी ची तपासणी खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत असल्याचा प्रकारही आहे.
दवाखान्याची इमारत गळकी असून त्यामुळे यंत्र व साहित्य खराब होऊ शकते. तसेच इमारत कागदोपत्री हस्तांतरित झालेली नाही, त्यामुळे कार्यालय सिंदखेडराजा येथेच आहे. तर २२ कर्मचारी मंजूर असून फक्त १२ कर्मचारी घेऊन काम करावे लागते अशी माहिती आहे.