कोलवड, पाडळी, रोहीणखेड, अंत्री, बोराखेडी, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
बुलडाणा, दि. 14 : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्य काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी खचून जावू नये. शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा धीर राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शेतकऱ्यांना दिला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. बुलडाणा तालुक्यातील कोलवड शिवारात पैनगंगेच्या पुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. तसेच पाडळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर मोताळा तालुक्यातील रोहीणखेड, बोराखेडी, अंत्री, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यंत्रणांनी पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय ग्राम समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे, तालुका कृषि अधिकारी श्री. मेरत आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शासन सर्वोतपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी गणेश देशमुख, तहसिलदार श्री. सोनावणे व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.