स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांच्या दणक्याने मिळाले अनुदानीत सोयाबीन बियाणे .महाबीजने शेतकऱ्यांसाठी चिखलीतच उपलब्ध करून दिले बियाणे
चिखली : महा-डीबीटी पोर्टलवर अनुदानीत बियाणेसाठी नोंदणी केलेली असतांनाही बियाणेपासुन वंचीत असल्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. दि.११ रोजी तालुक्यातील प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांच्या उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी अनुदानीत सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले असुन त्या परमीटधारक शेतकऱ्यांना अनुदानीत बियाणे वाटप करण्यात आले आहे.
तालुक्यात ९०हजार हेक्टर पेरणी लायक क्षेत्र असून बियाणे तुटवडा निर्माण होण्याची परिस्थीती असल्याने राज्य शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर बियाणे घटकांचा लाभ मिळावा यासाठी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडुन करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बियाणेसाठी ऑनलाइन पोर्टल वर नोंदणी केली होती. मात्र शेकडो शेतकरी अनुदानीत बियाणे पासुन वंचीत असल्याने तालुक्याचे खरीपासाठीचे क्षेत्र पाहता नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांसाठी अनुदानीत बियाणे उपलब्ध करुण देण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी आक्रमक पावित्रा घेऊन आंदोलनात्मक भुमिका घेत याबाबतची मागणी कृषी विभाग व महाबिजकडे केली होती. कृषी विभाग व महाबीजकडुन या मागणीची दखल घेतली गेली तर शेगाव तालुक्यासाठी ऑनलाईन नोंदणी कमी असल्याने तो शिल्लकचा बियाणेसाठा चिखली तालुक्यातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना देऊ केला. बियाणे शेगाव वरुन घेऊन यावे, त्यासाठी परमीट देखील वितरीत करण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांना वाहतुक खर्च न परवडणारा असल्याने ते अनुदानीत बियाणे चिखलीत उपलब्ध करुण देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला होता. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करण्यात येवून न्याय देण्याचे आश्वासन संबंधीत विभागाकडून देण्यात आले होते.
दरम्यान तालुक्यातील त्या ऑनलाईन नोंदणी केलेल्या परमीटधारक अंदाजे १६१ शेतकऱ्यांना चिखली येथील एस.कुमार अॅग्रो येथुन सोयाबीनच्या ३३४ अनुदानीत बॅग कृषी विभागाचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे,नगरसेवक दत्ता सुसर,रविराज टाले,राजेश सावळे, मनोज कुटे, संदिप जाधव, अॅड.गणेश थुट्टे, विठ्ठल वायाळ, गुलाब अंभोरे, गजानन बर्वेकर, पुरुषोत्तम भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.