बुलडाणा दि. 12 : – जिल्ह्यात अनाथ मुले मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्व बालकांची गृह चौकशी करून अनाथ बालकांच्या संपत्तीचे अधिकार अबाधित ठेवावे. जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्था आणि कोविड सेंटर येथे 1098 बाल मदत संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात एकही बालक वंचित राहू नये यासाठी महसूल, महिला व बाल विकास आणि ग्राम पंचायत विभागाने दक्षता घेवून सदर बालकांचे योग्य संगोपन होत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे निर्देश या वेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज दिले.
विभागाच्या वतीने दिनांक 11 जून 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या दालनात कोरोना महामारी मुळे अनाथ झालेल्या एक पालक आणि अनाथ बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी कृती दलाची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आरिफ सय्यद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, सदस्य बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री मराठे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री मारवाडी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, महसूल विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्फत बालकांच्या मालमत्तेच्या विक्रीवर ते 18 वर्षाचे होई पर्यंत मालमत्ता देखरेख व विक्री निर्बंध लावण्यात यावे. अनाथ व एक पालक बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात यावी. ज्या महिला कोरोना मुळे विधवा झालेल्या आहेत, अशा महिलांना इंदिरा गांधी विधवा योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत मदत देण्यात यावी. जिल्ह्यातील बालकांना कोरोना काळात मदत करण्यासाठी सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांनी देखील योगदान द्यावे व अशा बालकांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात एकूण 7 बालके आई आणि वडील गमावलेली आहेत. तसेच 187 बालके ही एक पालक असून आधी 194 बालके जिल्ह्यात आढळून आल्याची माहिती यावेळी बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली. याप्रसंगी बाल हक्क आणि अधिकार हे अधिकारी, कर्मचारी यांना कळावे या साठी जिल्ह्यात कार्यशाळा आयोजन करणे संदर्भात चर्चा करण्यात आली.