जीवलगाचा विरह त्यांच्या पश्चात खूप जाणवतो. त्यांचं असणं, त्यांचं वागणं सदैव स्मृतिंना उजाळा देत राहतं. त्याची केवळ आठवण केल्यानेच जगण्यातला विश्राम मिळतो असं नव्हे तर गेलेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी कसे वागतो यालाही खूप अर्थ असतो. विवेकानंद आश्रमाची मुंबईला शाखा असतांना व निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री तिथे रूग्णसेवा करत असतांनाच्या काळात अनेक भाविकांना त्यांच्या कृपा आशिर्वादाचा लाभ झाला आहे.
त्यातीलच एक स्व. रमेश देवधर (डोंबिवली) हे होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आश्रमाचे सक्रीय कार्यकर्ते व मार्गदर्शक रवि कलंत्रे यांनी आज विवेकानंद कोविड सेंटरला 100 वेपोरायझर भेट म्हणून दिले. रूग्णांना वाफ घेण्यासाठी व लवकर बरे होण्यासाठी या वेपोरायझरचा लाभ होणार आहे. मुंबईवरून कुरीयरने आज दि. 4 जून रोजी हे पार्सल आश्रमात आले. आश्रमाच्या वतीने या वेपोरायझरचे रूग्णांना वाटप करण्यात आले.