प्रजासत्ताक दिनी शिक्षण विभागाने बुलढाणा जिल्ह्यातील शाळा समिती अध्यक्षांना ठेवले ध्वजारोहणापासून दूर…
प्रजासत्ताक दिनी शिक्षण विभागाने बुलढाणा जिल्ह्यातील शाळा समिती अध्यक्षांना ठेवले ध्वजारोहणापासून दूर…
गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:-
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3000 पेक्षा जास्त शाळा समिती अध्यक्षांना या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणापासून वंचित ठेवण्याचे काम शिक्षण विभागाने केले असून. याची तक्रार सुनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गवई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना एका पत्राद्वारे केली आहे. माध्यमिक व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांनी एका पत्राद्वारे आचारसंहितेचे कारण देत यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी शाळा समिती अध्यक्षांना ध्वजारोहण न करण्याचा फतवा काढला होता. त्यामुळे तीन हजारापेक्षा जास्त शाळा समितिअध्यक्षांना यावेळी ध्वजारोहणाचा मान मिळाला नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक या दोघांवरही कठोर कारवाईची मागणी पांडुरंग गवई यांनी केली आहे. शिक्षक आमदार निवडीचे आचारसंहिता असल्याचे कारण देत या दोन्हीही शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहिते मध्ये असे नमूद आहे की महापौर, नगराध्यक्ष, कोणत्याही संस्थांचे अध्यक्ष आचारसंहितेमध्ये ध्वजारोहण करू शकतात परंतु त्यांना भाषण करण्याचा अधिकार नसतो त्यांच्या या अधिकारावर दोन्हीही शिक्षणाधिकाऱ्यांनी गदा आणल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पांडुरंग गवई यांनी केली आहे या दोन्हीही अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे..।