सिंदखेडराजा :- मतदानासाठी आजचा दिवस बघितला अन गेल्या काही वर्षांपासून असणारे असुरक्षेचे वातावरण माझ्या लक्षात आले.मतदान करुन बाहेर येत नाही तोच, चांगल्या पोस्टवर नोकरी करणारा एक माजी विद्यार्थी भेटला. त्याने सांगितले की, गावातीलच एका व्यक्तीजवळ त्याने नोंदणी फॉर्म भरून दिला होता. तरीही मतदान यादीत त्याचे व इतरांचे नाव नव्हते.
पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेले असल्याने, वेळेवर काहीच पर्याय नसल्याने, दोघेही निराश झालो.त्याचवेळी माझ्यासमोर काही वर्षांपूर्वीचा काळ झळकून गेला.माझ्या काळातील लोकं पदवीधर झाल्यावर खूप आशावादी असायचे. दारासमोरच्या पाटीवर स्वतःच्या नावाखाली डिग्री टाकायचे. पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी खूप जण झटायचे. त्यातून मतदार यादी तयार व्हायची. कुठलेही अभिनिवेश न बाळगता आम्ही मतदानाला जायचो. आपापल्या उमेदवाराला मतदान करायचो.
ह्यावेळी मात्र, मतदार नाव नोंदणी करतांना सगळ्यांना बोलवायचे. पण, फॉर्म भरून दिल्यावर ही व्यक्ती आपला मतदार होऊ शकतो की नाही? हे बघत ह्या व्यक्तीचे मतदान आपल्या उमेदवाराला होऊ शकत नाही. अशी कुणकुण लागली की त्या व्यक्तीचा नोंदणी फॉर्म बाजूला फेकायचा, नव्हेतर त्याला नोंदणी फॉर्म देण्यापासूनच वंचित ठेवायचे, खात्रीलायक माहितीनुसार व स्वतःच्या अनुभवातून असा प्रकार घडला आहे. तर ऑनलाइन नोंदणी केलेले काहीजण सुध्दा मतदार यादीत नाहीत.
खरंच काय जमाना आलाय? असं उदास होत म्हणावंसं वाटतंय.याचवेळी, कोणताही पदवीधर मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये, ह्यासाठी निर्वाचन आयोग काही करेल का? असा उपरोक्त परिस्थितीतून निर्माण होतोय.
त्यातूनच, यापूर्वी ज्यांनी उमेदवार म्हणून आपण उभे राहू असा विचार केला त्या “रण” जितण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी, स्वतःचे प्रतिनिधीपद तर ह्या प्रकारच्या सिलेक्टिव्ह यंत्रणेतून निश्चित केले नसावे ना? हा प्रश्नही आपसूकच उपस्थित होतो.
मतदान करण्यासाठी जाण्यापूर्वी अनेकांनी मला कॉल करुन, फक्त धीर धर असा, मोलाचा संदेश दिला होता.फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा नव्हेतर त्यातल्या त्यात, देशातील विविध प्रकारच्या घटना बघत, अवलोकन करीत स्वतःचे निर्णय, स्वतः घेणारा मी पुरोगामी आहे. “ऐकावे जणांचे करावे मनाचे” ह्या उक्तीनुसार प्रत्येकाच्या भावनेचा आदर करीत, कुणी काहीही सांगितले तरी, त्यांचे मी किती ऐकावे? हे ठरलेलेच.
तरीही येनकेन प्रकारे आपणच कायम सत्तेत असावे, ह्यासाठी बिलंदर योजना राबविणारे कोण? हे आपण सर्व ओळखून आहोत.
याचवेळी “धीर” धरण्यासाठी संघर्ष करीत पुढे जाणाऱ्या युवकांचे सोशल मीडियावरील, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संदेश देणाऱ्यांचे म्हणणे मी जाणीवपूर्वक ऐकले आहे.
हार्ड हिटर “धीर” धारणाऱ्या धोरणांचा विजय निश्चित आहे.
माझ्या माणुसकीच्या परिपेक्षात असणारे सर्वच मला जाणतात.
अर्धी भाकर खाऊन समाधान मानणारे आपण सोबत आहोतच ..!🙏