सिंदखेडराजा :- शासनाकडून सरपंचांना मिळणाऱ्या मानधनातून 5 हजार रुपयांचा धनादेश तालुक्यातील पिंपळगाव सोनारा सरपंचांनी कोरोना निर्मूलन कार्याला मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. कोविड रोग प्रसाराच्या काळात शासनाला येणाऱ्या खर्चामध्ये खारीच्या वाट्याप्रमाणे मदत करण्याचा हा अनोखा प्रकार चर्चिला जात आहे.
पिंपळगाव सोनारा येथील सरपंच तोताराम ठोसरे यांचा वाढदिवस नुकताच होऊन गेला. सर्वत्र कोरोना संसर्गाचे संकट पाहता वाढदिवस साजरा करण्याऐवजी शासनाला काही मदत करावी, ह्या हेतूने ठोसरे यांनी ठरवले. याचवेळी तालुक्यातील रा.काँ.चे नेते गजानन बंगाळे यांनी सरपंचांना मिळणाऱ्या मानधनातून पाच हजार रुपये धनादेशाद्वारे देण्याचा मार्ग सुचवला. त्यानुसार तोताराम ठोसरे यांनी पाच हजारांचा धनादेश तयार करुन तहसीलदार कार्यालय गाठले व अव्वल कारकून शिवाजी पापुलवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. यावेळी तोताराम ठोसरे, गजानन बंगाळे, रामदास कहाळे, विनोद खरात, अलकाताई लव्हाळे, दीपक तुपकर, सविताताई संजय तळेकर, अशोक रिंढे, शिवाजी लहाने, उमेश शेजुळ, सचिव संतोष गिरी आदि उपस्थित होते.
सरपंच तोताराम ठोसरे यांचा ह्या उपक्रमाचे तालुक्यातील राजकीय व पदाधिकारी वर्तुळात स्वागत होत आहे.