- 31 मार्च 2022 पर्यंत चालणार महा आवास अभियान
- मंजूर 100 टक्के घरकुलास पहिल्या हप्त्याचे वितरण
- प्रलंबित घरकुलांना प्राधान्याने पूर्ण करणार
बुलडाणा,दि.30 : सर्वांसाठी घरे 2022 या केंद्र शासनाच्या धोरणाचा राज्य शासनाने स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून विविध ग्रामीण गृह निर्माणच्या योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेता असून त्यासाठी 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत महा आवास अभियान- ग्रामीण राबविण्यात येत आहे.
अभियानातंर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देणे. सन 2016-17 ते 2021-22 पर्यंत जिल्ह्यांना वितरीत करण्यात आलेल्या घरकुलांच्या उद्दिष्टाप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे. मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण करणे, घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, 100 टक्के मंजूर घरकुलास पहिल्या हप्त्याचे वितरण करणे, प्रलंबित घरकुले पुर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पुर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे, शासकीय योजनांशी कृती संगम करून लाभार्थ्यांना अन्य योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
अभियानातंर्गत कोरोना संसर्ग सुरक्षा नियम पाळून विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरीय कार्यशाळेत ग्राम कृती गटाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर किंवा गावपातळीवर घरासाठी कर्ज घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बँक मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. महाआवास अभियान कालावधीत उत्कृष्ट कामासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हे प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट तालुके प्रथम तीन, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायय प्रथम तीन व सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल अशा प्रकारात प्रथम तीन पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट तालुके, ग्रामपंचायत, घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट बँक शाखा, शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट प्रथम तीन कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट क्लस्टर, ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट बँक शाखा प्रथम तीन, तालुकास्तर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट घरकूल, ग्रामपंचायत स्तरावर सर्वोत्कृष्ट घरकूल प्रथम तीन यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर पुरस्कार निवडीसाठी 100 गुणांचे निकष देण्यात आले असून सर्वोत्कृष्ट घरकूल, बहुमजली इमारत व गृहसंकुलासाठी 100 गुणांचे निकष आहेत, असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बुलडाणा यांनी कळविले आहे.
अन्य योजनांशी कृतिसंगमातून हा लाभ मिळणार
मनरेगामधून रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधून शौचालय, जल जीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी, राष्ट्रीय ग्रामीध जीवनोन्नती अभियानातून उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.