गजानन सोनटक्के जळगाव जा
श्रीक्षेत्र वझेगाव :-
विदर्भातील अवलिया संत म्हणून अवघ्या राज्यातील भाविकांची श्रद्धा असलेले श्रीक्षेत्र वझेगाव येथील परमहंस रामचंद्र महाराज यांनी १७ मे रोजी रात्री १२ वाजून १९ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला व दुपारी १२ वाजता महाराज समाधिस्थ झाले आहेत. अवलिया संत असल्याने रामचंद्र महाराजांप्रती महाराष्ट्र राज्यासह इतरही राज्यातील भाविकांची अपार श्रद्धा आहे. दर सोमवारी श्रीक्षेत्र वझेगाव नगरीत भाविकांचा मांदियाळी असायची त्यामुळे वझेगाव नगरीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम श्रींच्या संस्थान मध्ये होत असतात तसेच हनुमान जयंतीला वझेगाव नगरीतून परमहंस रामचंद्र महाराजांची भव्य मिरवणूक निघते तर यात्रा देखील उत्सवा दरम्यान भरत असते.
या यात्रेत संपूर्ण राज्यातील भाविक भक्त दर्शनासाठी येतात तर गुजरात, राजस्थान येथील भाविक देखील महाराजांच्या दर्शनासाठी नियमित वारी करत असत परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामचंद्र महाराज संस्थान कडून खबरदारी म्हणून मागील दोन यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते तर १७ मे रोजी रात्री १२ वाजून १९ मिनिटांनी परमहंस श्री रामचंद्र महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला व १७ मे रोजी दुपारी १२ वाजता परमहंस रामचंद्र महाराज समाधिस्थ झाले आहेत. त्यामुळे भविकांवर दुःख कोसळले असले तरी कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेवता भाविक भक्तांनी घरूनच दर्शन घ्यावे कोणीही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येई पर्यंत वझेगाव संस्थानवर येऊ नये असे आवाहन संस्थान कडून करण्यात आले आहे.