बुलडाणा दि. 20: सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्याच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयी 22 जुलै 2021 रोजी सर्व रोग निदान शिबीर घेण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय बुलडाणा येथे दि 22 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 2 वर्षापासून उद्भवलेली कोरोना रोगाची परिस्थिती आतापर्यंत आरोग्य विभागाने अत्यंत काळजीपुर्वक हाताळलेली आहे. कोरोना रोगाचा सामना यशस्वीरित्या पार पाडला आहे. परंतु ज्याप्रमाणे कोरोना हा एक रोग आहे, त्याचप्रमाणे मनुष्याला त्याच्या आरोग्याशी निगडीत अजुन ब-याच समस्या असतात. परंतु कोरोना काळ असल्यामुळे त्याला त्याच्या अन्य रोगावर पाहीजे, त्याप्रमाणात लक्ष देता आले नाही. त्यासाठी सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन केले, तर तळागळातील जनतेला त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करता येईल.
याच हेतुने जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात जिल्हाभरातील आरोग्य संस्था मधील विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी सेवा देणार आहे.या शिबीरात ॲलोपॅथी, हामिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी पद्वतीने रोगाची चिकित्सा व निदान करण्यात येणार आहे. शिबीरामध्ये रोगनिदान करण्यासाठी आवश्यक असणा-या विविध चाचण्या जसे क्ष किरण तपसणी, सी.टी. स्कॅन, सोनोग्राफी, ई.सी.जी. व प्रयोगशाळेशी निगडीत चाचण्या सुद्वा लगेच करण्यात येणार आहे. सदर शिबीराचा लाभ जिल्ह्यातील जनतेने आपल्या आरोग्य विषक समस्या सोडविण्यासाठी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिहित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.