बुलडाणा, दि.28 : अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे 8 जून 2021 च्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना कॅश रिसीप्ट, पर्चेस, कॅश मेमो व देयक या सर्वांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत प्राप्त 14 अंकी परवाना व नोंदणी क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. ही सक्ती 1 ऑक्टोंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामागे ग्राहकांना सदर अन्न व्यावसायिकाबद्दल अतिरिक्त माहिती उपलब्ध करणे व माहितीच्या अनुषंगाने ते एखाद्या अन्न व्यावसायिकाबाबत गरजेनुसार एफएसएसएआय पोर्टलवर तक्रार नोंदविता येणे हा हेतू आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व देयकांवर 14 अंकी एफएसएसएआय परवाना/ नोंदणी क्रमांक 1 ऑक्टोंबर 2021 पासून नमूद करावा. अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त (अन्न) स. द केदारे यांनी कळविले आहे.